विराट जरा धीराने घे…

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा भारतीय क्रीडा विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. 19 वर्षाखालील भारतीय संघाला जगजेत्ता बनवल्यापासून तो जरा जास्तच फोकस मध्ये आला. आपल्या अक्रमक आणि बिनधास्त खेळाच्या जोरावर तो सचिन, युवराज, धोनी असलेल्य भारतीय टीममध्ये देखील आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात तो यशस्वी झाला. व्यक्तीपूजनात टॉप केलेल्या भारतीयांना विराटला डोक्‍यावर घेतले. त्यानंतर त्याने मागे वळून पहिलेच नाही. अनेक विक्रम आपल्या नावे करणाऱ्या विराटच्या डोक्‍यात हवा भरलीय की काय? असा प्रश्न त्याच्या अनेक निर्णयातून दिसतो. तर कधी भारतीय प्रशंसकांना देखील तो डिवचताना दिलेत आह. त्यामुळे त्याला जरा मागे वळून पाहण्याची गरज आहे.

आपल्या आक्रमक पण सातत्यपूर्ण खेळामुळे विराट तरुणाईमध्ये लवकरच लोकप्रिय झाला.त्याचे निरागस दिसणे, ट्रेंडी लुक ठेवणे. यामुळे तो मैदानाच्या बाहेर देखील खऱ्या अर्थाने आयकॉन ठरत होता. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने जो करिष्मा करून दाखवला त्यामुळे त्याच्यातील फलंदाजाला वैश्विक स्तरावर नावाजले गेले. त्यानंतर सलग दोन टी-20 विश्वचषकात देखील तोच हिरो होता. परंतु,जसजसा त्याच्या कामगिरीचा आलेख वाढला. तसतसा त्याच्यातील आक्रमकपणा वाढत गेला. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला अनेकवेळा स्लेजिंगच्या रूपाने डिवचले गेले. त्यानेही कधी शब्दांनी तर अधिकवेळा आपल्या बॅटनेच उत्तर देणे पसंत केले. त्याच्या निर्भीडपणाचे आणि आक्रमकपणाचे सर्वत्र कौतुक होत गेले. कारण त्याचा खेळ इतका उजवा होता की बाकी सर्व गोष्टी गौण ठरल्या. कांगारूंना त्यांच्याच शैलीत धडा शिकवल्याने त्याचे सर्वत्र गुणगान झाले. त्या दौऱ्यानंतर विराट खूपच बदलला.

आपला मूळ स्वभाव हा आक्रमकता आहे, हे दाखवण्याची कोणतीच संधी त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेर कुठेच सोडली नाही. खेळाडूंचे मानधन आणखी वाढावेत यासाठी त्याने पुढाकार घेतला. कर्णधार म्हणून त्याने तो घ्यायलाच हवा. त्याचबरोबर परदेशी दौऱ्यावर खेळाडूंनी पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआयने द्यावी. यासाठीही तो पुढाकार घेत आहे वृत्त अनेकदा वाचनात येते. बीसीसीआयच्या मुद्यापर्यंत त्याचे आक्रमक होणे ठीक आहे. परंतु, एखाद्या भारतीय प्रशंसकाला तुला भारतीय खेळाडूंपेक्षा परदेशी खेळाडू आवडत असतील तर देश सोडून जा, असा सल्ला देणे भारतीय संघाच्या कर्णधाराला शोभत नाही. विराटच्या आक्रमकतेमधील हा फाजीलपणा अश्‍या अनेक बाबींमुळे पुढे येत आहे. यावर बीसीसीआयने कधीनाही ते आपल्या लाडक्‍या कर्णधाराला झापले आहे. कारण कोणताच खेळाडू हा खेळापेक्षा मोठा होऊ शकत नाही.

क्रिकेटने व्यवसायिकरणाच्या अगोदरदेखील आपला सुवर्णकाळ पहिला आहे. आग ओकणारे गोलंदाज पहिले आहेत तर विनाहेल्मेटचे फक्त आपल्या शुद्ध तंत्राच्या जोरावर निर्भीडपणे तेज गोलंदाजांना सामोरे जाणारे महान गावस्कर पहिले आहेत. विवियन रिचर्डस आणि डॉन ब्रॅडमॅनचा सुवर्णकाळ तर अजूनही आठवला जातो. बाहेरच्या खेळाडूंचे सोडा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी जे खेळासाठी दिले आहे ते खूप मोठे आहे. विराट त्याच्या अजून आसपास देखील नाही. परंतु, या खेळाडूंचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. विराटने त्यांचा आदर्श घेऊन आपल्यात काही बदल करायला हवेत. जेणेकरून तो जेव्हा निवृत्ती घेईन तेव्हा त्याच्याकडे एक महान खेळाडू म्हणून आणि एक चांगला माणूस म्हणून देखील क्रिकेटप्रेमी पाहतील.

– राजकुमार ढगे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)