विम्याची रक्कम हडपण्यासाठी बहिणीला ठरवले मृत

सख्ख्या भावासह एलआयसी एजंटला दोन दिवसांची कोठडी

मेणवली, दि. 12 (प्रतिनिधी) – विम्याची रक्कम हडप करण्यासाठी एलआयसी एजंटच्या मदतीने जीवंतपणीच सख्ख्या बहिणीला मयत ठरवून मृत्यूचाही बनावट दाखल तयार करणाऱ्या भावासह संबंधित एलआयसी एजंटला वाई पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश श्रीपती मांढरे (रा. मांढरदेव) असे सख्ख्या भावाचे तर अजय धर्मराज शिर्के (रा. वडाचे म्हसवे, ता. जावली) असे एलआयसी एजंटचे नाव आहे. अजय शिर्के हा जावली पंचायत समितीच्या माजी सभापतींचा नवरा आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सपोनि राजेंद्र निंबाळकर यांनी दिली.
वडाचे म्हसवे, ता. जावली येथील रहिवासी असलेल्या रंगूबाई जगन्नाथ शिर्के यांनी त्यांच्याच म्हसवे गावातील एलआयसी एजंट अजय धर्मराज शिर्के यांच्याकडे विमा पॉलीसी काढली होती. सदरच्या विमा पॉलिसीला मांढरदेव, ता. वाई येथील सख्खा भाऊ प्रकाश मांढरे यास वारस म्हणून नोंद केली होती. रंगुबाई शिर्के यांनी विमा पॉलिसीवर पेन्शन सुरू करण्यासाठी विमा कार्यालयात संपर्क केल्यावर विमा धारकाला जिवंत बघून एलआयसी अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. सदर घटनेची चौकशी केल्यावर भाऊ बहिणीच्या नात्याला सख्ख्या भावानेचा काळिमा फासल्याचे उघड झाले. रंगुबाई शिर्के यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून एलआयसी एजंट अजय शिर्के व वारस भाऊ प्रकाश मांढरे यांनी संगनमत करून रंगुबाई यांचा खोटा मृत्यूचा दाखला तयार करून एलआयसी विभागाला चुना लावून रंगुबाई यांची रक्कम निम्मी-निम्मी हडप करण्याचा हेतू शाखा अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर वाई पोलिसात या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा सखोल तपास करून वाई पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)