विम्बल्डन : अलेक्‍झांड्रो फोकिना, क्‍लॅरे लियू कुमार गटात विजेते

विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील कुमार गटात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे जगातील समस्त टेनिसशौकिनांचे लक्ष लागलेले असते. कारण हेच गुणवान कुमार खेळाडू भविष्यात वरिष्ठ गटातही नेत्रदीपक कामगिरी करून ग्रॅंड स्लॅम विजेतेही बनतात. या वेळी स्पेनचा अलेक्‍झांड्रो डेव्हिडोविच फोकिना आणि अमेरिकेची क्‍लॅरे लियू या कुमार खेळाडूंनी अनुक्रमे कुमार मुले व कुमार मुलींच्या एकेरीत विेतेपदाचा मान मिळविताना उज्ज्वल भवितव्याची ग्वाही दिली. स्पेनच्या आठव्या मानांकित अलेक्‍झांड्रो डेव्हिडोविच फोकिनाने अर्जेंटिनाच्या बिगरमानांकित ऍक्‍सेल जेलरचा प्रतिकार 7-6, 6-3 असा मोडून काढताना कुमार मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. तर तृतीय मानांकित क्‍लॅरे लियूने अमेरिकेच्याच बिगरमानांकित ऍन ली हिची कडवी झुंज 6-2, 5-7, 6-2 अशी मोडून काढताना कुमार मुलींच्या एकेरीत विजेतेपदाची निश्‍चिती केली.

ऍक्‍सेल जेलरने कुमार मुलांच्या दुहेरीत मात्र तैपेईच्या यु हसियु हसु याच्या साथीत विजेतेपद पटकावताना एकेरीतील पराभवाची काही प्रमाणात भरपाई केली. ऍक्‍सेल जेलर व यु हसियु हसु या द्वितीय मानांकित जोडीने एकतर्फी अंतिम लढतीत ऑस्ट्रियाचा जुरिज रॉडिनोव्ह व झेक प्रजासत्ताकाचा मायकेल व्हरबेन्स्की या तृतीय मानांकित जोडीचा 6-4, 6-4 असा पराभव करताना कुमार मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. कुमार मुलींच्या दुहेरीची अंतिम लढतही एकतर्फीच ठरली. सर्बियाची ओल्गा डॅनिलोविच व स्लोव्हाकियाची काया युव्हॅन या बिगरमानांकित जोडीने कॅथरिन मॅकनेली व व्हिटनी ऑस्विग्वे या अमेरिकेच्याच चतुर्थ मानांकित जोडीला 6-4, 6-3 असे पराभूत करताना कुमार मुलींच्या दुहेरीत विजेतेपद पटकावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)