विमानतळ विरोधात शेतकरी करणार चक्काजाम

खळद- शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना देखील सरकारने पुरंदर विमानतळाबाबत अधिसूचना जारी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीचे गट क्रमांक देखील जारी केल्याने पुरंदर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोमवारी (दि. 6) चक्काजाम आंदोलन करून शेतकरी सरकारच्या कृतीचा निषेध करणार आहेत.
पुरंदर तालुक्‍यातील नियोजित विमानतळास पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर, मूंजवडी, कुंभारवळण, वनपूरी, उदाचीवाडी या सात गावांतील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच विमानतळाच्या विरोधात अनेक वेळा मोर्चा, अंदोलने, उपोषण केले आहे. राष्ट्रपतींना पत्र पाठवुन विमानतळाला विरोध दर्शविला आहे. तरी देखील सरकार आपल्या भुमिकेवर ठाम असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांनी पारगाव चौफुला येथे सासवड-सुपे व जेजुरी-उरळीकांचन रोड, वनपूरी ते सासवड-भुलेश्वर-यवत रोड, खानवडी गावठान-महात्मा फुले स्मारक रोड, झेंडेवाडी-कुंभारवळण रोड आंदोलन केले जाणार आहे. शेतकरी गुराढोरांसह रस्त्यांवर ठिय्या देणार आहेत.
पुरंदर विमानतळासाठी आमच्या जमिनी घेतल्यास मुलांना जगण्यासाठी रोज मरण यातना सोसाव्या लागणार आहेत. त्यापेक्षा विमानतळाला विरोध करून मरण आले तरी बेहत्तर अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. आंदोलना संदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीत संतोष कुंभारकर, नामदेव कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, अभिमन्यु कुंभारकर, संतोष हगवणे, मनिषा होले, रामदास होले, लक्ष्मण बोरावके समवेत अनेक शेतकरी उपस्थित होते.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जेलभरो
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सातही गावांचे सरपंच व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने जर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जेलभरो, प्राणांतिक उपोषण करून आत्मत्याग करण्याचा इशारा पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे प्रवक्ता जितेंद्र मेमाणे यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)