नवी दिल्ली – बुधवारी विप्रोने नफा 20 टक्क्यांनी कमी झाल्याचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर आज शेअरबाजारात या कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. कंपनीचा शेअर आज 2 टक्क्यांनी कमी झाला आणि कंपनीचे बाजारमूल्य एकाच दिवसात 2597 कोटी रुपयांनी कमी होऊन 127325 कोटी रुपये झाले. एक वेळ कंपनीचा शेअर 4.56 टक्क्यापर्यंत कमी झाला होता. मात्र नंतर त्यात थोडी सुधारणा झाली. असे असले तरी रुपया वधारत असल्यामुळे इतर कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी होऊन शेअरबाजार निर्देशांक वाढले.
ग्राहक वस्तू कंपन्या आणि बॅंकांच्या शेअरची आज जास्त प्रमाणात खरेदी झाली. देशातील संस्थागत गुंतवणूकदार जास्त प्रमाणात खरेदी करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे.गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 212 अंकांनी वाढून 34713 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 47 अंकांनी वाढून 10617 अंकांवर बंद झाला. 5 फेब्रुवारीनंतर निर्देशांक प्रथमच या पातळीवर गेले आहे.
यस बॅंकेने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे बाजारात आज सकारात्मक वातावरण होते. या बॅंकेला चौथ्या तिमाहीत झालेल्या नफ्यात 29 टक्के वाढ होऊन तो 1179 कोटी रुपये झाला आहे. काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 435 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 304 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. जागतिक बाजारात आज संमिश्र वातावरण होते.
आता मोठ्या कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्या आधारावर निर्देशांकांना दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर क्रुडचे वाढणारे दर आणि कर्नाटकमधील निवडणुकाकडेही गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष असणार आहे. क्रुडचे दर सध्या 75 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा