विन्टर पार्टी

खरेदीसाठी तसंही कोणतं निमित्त लागत नाही. आणि एखादं निमित्त असेल तर मात्र खरेदीला उधाणच येतं. बदलती फॅशन ही विशेषत: तरुणवर्गाला खुणावत असते. कपडे खरेदीकडे तरुण वर्गाचा विशेषत: तरुणींचा कल जास्त असतो. आता थंडीनं जोर धरायला सुरुवात केलीय म्हटल्यावर थंडीतली खरेदी एव्हाना झालीही असावी. मात्र, याच मोसमात लगबग असते ती पार्ट्यांची ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टी म्हणजे तरुणांसाठी जल्लोषाचं वातावरण.

मुळातच आपल्या दिसण्याबाबत प्रचंड कॉन्शिअस असलेल्या तरुणी या पार्ट्यांमध्ये तर इतरांपेक्षा हटके लूक दिसण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या पार्टी लूकमध्ये भर घालण्यासाठी आता दुकानंही सज्ज झालीएत. वन पीस, टू पीस, पार्टी गाऊन किंवा फॉरमल्स या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये लक्ष वेधून घेतात. थंडीतील पार्ट्यासाठी वन पीस, गाऊन्ससारखी शॉपिंग करताना उबदार कापड निवडावं. विशेषत: अशा पाटर्याचं एखाद्या लॉनवर किंवा टेरेससारख्या ठिकाणी आयोजन केलं जातं. शिवाय त्या रात्रीच रंगत असल्यामुळे वातावरणात गारवा अधिकच असतो. अशा वेळी पातळ किंवा अंगाला चिटकणारे असे सिल्क कपडे वापरण्यापेक्षा वुलन, सुती किंवा जाड फॅब्रिकचे स्टायलिश कपडे वापरावेत. तसंच लॉंग स्लीव्हचे, जास्त अस्तर असणारे पार्टीवेअर वापरल्यास थंडीपासून काही प्रमाणात बचाव होऊ शकेल. गडद रंग हा उष्णतावर्धक असल्यामुळे रात्री पार्टी असल्यास या दिवसांत गडद रंगाचा वापर केल्यास एकूणच व्यक्तिमत्त्व उठून दिसते.

दिवसा असणाऱ्या पार्टीसाठी मात्र फ्लोरोसंट, फिकट रंगाचे कपडे उठून दिसतील. डिझायनर वेअर व्यतिरिक्त आपला लूक थोडा बबली ठेवायचा असेल तर आता फॅशनमध्ये असणाऱ्या फ्लॉवर प्रिंटमध्ये जिन्स-टॉप किंवा धोती-कुर्तेसुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पार्टीवेअर कपड्यांमध्ये एम्ब्रॉइडरी, डायमंड वर्क, कुंदन वर्क, मोती वर्क, जरी वर्क, फ्लॉवर प्रिंट, अॅनिमल प्रिंट इ. विविध कलाकुसर केलेले वन पीस किंवा गाऊन्स चांगले दिसतात.

पार्टी म्हटली की, अर्थातच संगीताच्या तालावर थिरकणं आलंच! आणि खरंच तुम्ही नाचगाण्याचे दिवाणे असाल, संगीत सुरू होताच अख्खं जग विसरून नाचत असाल तर लॉंग गाऊनसारखे हेवीवेट कपडे अंगावर बाळगण्यापेक्षा कम्फर्टेबल गुडघ्यापर्यंत येणारे वन पीस किंवा जिन्स-टॉप वापरल्यास नाचताना पोशाख पायात अडकून पडण्याची भीती राहणार नाही. आणि तुम्ही चारचौघात आत्मविश्वासानं वावरू शकाल. थंडीत स्कार्फ, स्ट्रोलची फॅशन इन असते. पार्टीसाठी आपण जे कपडे खरेदी करणार असू त्यावर साजेसा आणि खास रंगसंगती असणारा स्कार्फ किंवा स्ट्रोल जवळ ठेवल्यास थंडी जाणवणार नाही आणि तुमच्या लूकमध्येही उठावदारपणा येईल.

बऱ्याचदा चांगलं बजेट असूनसुद्धा बाजारातील गर्दी, प्रवासाचा त्रास या गोष्टींना कंटाळून आपण घाईघाईतच सगळी खरेदी करतो. अनेकदा पैसेही जास्त खर्च होतात. म्हणूनच सरसकट सगळया वस्तू घाईघाईत खरेदी करण्यापेक्षा थोडासा मोकळा वेळ काढून वस्तू खरेदी केल्यास आपली कपड्यांमधील आवडही जोपासता येते आणि पैशाचीही बचत होते. बाजारात जाण्याचा फारच कंटाळा येत असेल किंवा कामामुळे जाणं शक्‍य होत नसेल तर ऑनलाइन खरेदी हादेखील उत्तम पर्याय आहे. इंटरनेटवर अशा अनेक कंपनीच्या वेबसाइट्‌स आहेत, ज्यावर तुमच्या आवडीचे आणि बजेटमध्ये बसणारे कपडे आणि इतर अॅक्‍सेसरीज खरेदी करू शकता.

– श्रुती कुलकर्णी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)