विना अनुदानित शिक्षकांची आळंदी ते मुंबई सायकल अनुदान वारी

सोमाटणे, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आळंदी ते आझाद मैदान (मुंबई) सायकल अनुदान वारी काढण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 22) आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे आशीर्वाद घेवून प्रस्थान होणार असून, बुधवार (दि. 26) आझाद मैदान (मुंबई) येथे महामोर्चा दाखल होणार आहे. या मध्ये राज्यभरातून विना अनुदानित शाळेतील शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली.

पुणे येथे शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वारीतून शासनाचे लक्ष शिक्षकांच्या प्रश्‍नावर केंद्रीत करणार असून, येत्या अधिवेशनात शिक्षकांचे व विना अनुदानित शाळांचे प्रश्‍न सोडविण्यास भाग पडणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षांपासून शासनाने विना अनुदानित शाळांवर खूप मोठा अन्याय केला असून, अनेक वेळा आश्‍वासने देवूनही 1 व 2 जुलैच्या शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा घोषीत होण्यासाठी प्रलंबित ठेवल्या आहेत. तसेच 20 टक्के अनुदान घेतलेल्या शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान देण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज व त्यानंतर 59 शिक्षकांवर उर्वरित सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. 20 टक्के अनुदान पात्र शाळेतील अतिरिक्‍त झालेल्या शिक्षकांना सेवेत समावून घेण्यात यावे. मागील वर्षी शासनाने 5 जुलै 2016 रोजी दिलेल्या आश्‍वासनाची येत्या पावसाळी अधिवेशनात पूर्तता व्हावी याकरिता मागण्यांचे निवेदन घेवून सरकार दरबारी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य भरातील शिक्षक आपापली सायकल घेवून या अनोख्या वारीत सहभागील होणार आहेत. मुंबईत आझाद मैदानावर मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे येथील बैठकीत संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण मराठे, राज्य संघटक पुंडलिक रहाटे, आर. बाविस्कर शशिकांत जाधव, बद्रीनारायण पाटील यांनी माहिती दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)