तेरा जण जखमी : अप्पर, इंदिरानगर येथील प्रकार

पुणे – अप्पर इंदिरानगर भागात उतारावर लावलेली मोटार विनावाहक धावली. मोटारीचा हॅन्डडब्रेक न लावल्याने ही घटना घडली. धावत्या मोटारीने धडक दिल्याने तेरा पादचारी तसेच रस्त्याच्या कडेला असलेले काही पथारीवाले जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी मोटार चालक अजुबकुमार सिन्हा (वय 40, सध्या रा. उंड्री, मूळ रा. झारखंड) याला बिबवेवाडी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिन्हा अप्पर इंदिरानगर भागात शनिवारी सायंकाळी कामानिमित्त आला होता. तेथील उतारावर त्याने मोटार लावली. मोटार उतारावर लावताना त्याने हॅन्डब्रेक लावण्याची गरज होती.

मात्र, त्याने दुर्लक्ष केले. एका दुकानात तो खरेदीसाठी गेला. तेव्हा मोटार उतारावरून पुढे गेली आणि तेथून जात असलेल्या पादचाऱ्यांना धडक दिली. रस्त्याच्या कडेला असलेल्या पथारीवाल्यांना मोटारीने धडक दिली. दरम्यान, नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्यांनी मोटार अडवली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक बाळा ओसवाल, रूपाली धाडवे, वर्षा साठे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बिबवेवाडी पोलिसांनी जखमी झालेल्या पादचाऱ्यांना रूग्णालयात दाखल केले. या घटनेत उषा विश्‍वकर्मा, मीनाक्षी बिराजदार, लक्ष्मी बिराजदार या गंभीर जखमी झाल्या आहेत. एकूण 13 जण जखमी झाले आहेत. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. या भागात तीव्र उतार आहे. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात तेथे घडतात. याप्रश्‍नी वेळोवेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. तसेच सभागृहात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता, असे ओसवाल, धाडवे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)