विनापरवाना गैरहजर राहणे पडले महागात

– चंद्रशेखर नार्वेकरची होणार खातेनिहाय चौकशी

पिंपरी – विनापरवाना गैरहजर राहून कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चंद्रशेखर नार्वेकर यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिका फ क्षेत्रीय कार्यालयात चंद्रशेखर नार्वेकर हे स्थापत्य विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे चिखलीच्या प्रभाग क्र.3 मधील पर्यवेक्षकीय कामकाज सोपविण्यात आलेले आहे. मात्र, नार्वेकर हे दि.14 सप्टेंबर 2015 पासून विनापरवाना गैरहजर राहत असल्याने त्यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. परंतु, नार्वेकर हे घरातून निघून गेले असल्याबाबत त्यांची आई मंगला नार्वेकर यांनी फ क्षेत्रीय कार्यालयास कळविले आहे. तसेच, नार्वेकर यांच्या विरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे.

दरम्यान, नार्वेकर यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची बाब पालिका निदर्शनास आणून न दिल्याने, महापालिकेची दिशाभूल केलेली आहे. तसेच, फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये विनापरवाना गैरहजर राहून कामकाजात अडथळा निर्माण केलेला आहे. त्यांनी नियमांचा, शिस्तीचा भंग व कामकाजात निष्काळजीपणा करुन कर्तव्यात हयगय व अक्षम्य निष्काळजीपणा केलेला आहे. त्यामुळे नार्वेकर यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले असून, भविष्यात कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना सचोटी, कर्तव्यपालनात कसूर केल्यास कडक शास्तीची कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)