विनापरवाना खते उत्पादन, साठा, विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

लोणी काळभोर- शेतीमध्ये वापरण्यात येणारी खते विनापरवाना बनवून, साठा करून विक्री केल्याबद्दल, हवेली पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास रघुनाथ नलावडे (रा. पुणे सातारा रस्ता, शिवदर्शन, पर्वती, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अमित विजयसिंह रणवरे (वय 42, रा. मांजरी रोड, केशवनगर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलीससूत्रांनी दिलेली माहिती अशी, अमित रणवरे हे गुणवत्ता निरीक्षक तथा कृषी अधिकारी म्हणून हवेली पंचायत समितीमध्ये काम करतात. अमित रणवरे यांना व्हॉटस ऍपवर पुण्यातील रामा फर्टिकेम (बावधन, पुणे) या कंपनीने बनवलेल्या डिएपी या खताच्या पिशवीचा फोटो आढळून आला होता. तसेच या फोटोतील कंपनीचा परवानाही नकली असल्याचा संशय त्यांना आला होता. म्हणून त्यांनी परवाना आधिकारी तथा कृषी संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे येथे या परवान्याबाबतीत माहिती घेतली. यावेळी रामा फर्टिकेम या कंपनीला हे खत बनवण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना देण्यात आला नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अमित रणवरे यांनी या कंपनीचे जबाबदार व्यक्ती म्हणून विकास रघुनाथ नलावडे यांच्याशी संपर्क साधला. या कंपनीच्या गोदामाबाबत माहिती घेऊन वडकी (ता. हवेली) येथील दादासाहेब तुकाराम आंबेकर यांच्या मालकीच्या गोदामाला भेट दिली. तेथे मिश्र खतांचे दहा किलोचे पुडे असलेली आठ पोती सापडली. या आठ पोत्यात 36 हजार रुपये किंमतीचे डिएपी खत होते. या खतांची विक्री करू नये, असा आदेश त्यांनी दिला आहे. एक महिन्यापूर्वीच हे गोदाम सुरू झाले होते. खत नियंत्रण आदेश 1955 आणि अत्यावश्‍यक वस्तू कायदा 1955 चे कलम 7 नुसार हा गुन्हा आहे. त्यामुळे या दोन्ही कलमान्वये लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र महानोर करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)