विनातपासणी अहवाल देणाऱ्या “टेस्टिंग लॅब’चा सुळसुळाट

पिंपरी – बांधकाम कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम साहित्याची तपासणी करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांकडे जागृती वाढता आहे. त्याचा गैरफायदा घेत शहरात बांधकाम साहित्य टेस्टिंग लॅबचा सुळसुळाट झाला आहे. बांधकाम साहित्याची शास्त्रशुध्द तपासणी न करताच अहवाल दिला जात आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक तपासणीसाठी एक तर प्रत्यक्षात दुसरेच साहित्य वापरत आहेत. याची फेरतपासणी करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नसल्याने बांधकामांच्या दर्जाबाबत साशंकता कायम आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा चोहोबाजुने विस्तार होत आहे. समाविष्ट गावांमध्ये जोमाने बांधकामे सुरू आहेत. शहरातील पायाभूत सोयी सुविधांच्या विकासामुळे शहरात घरोबा करणाऱ्यांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. कामगारनगरी ही शहराची ओळख पुसून बांधकामनगरी अशी नवी ओळख शहराला प्राप्त होत असल्याचे समाविष्ट गावांमध्ये उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारतींवरुन पहायला मिळत आहे. एकीकडे कष्टाचा पैसा ओतून शहरवासीय निवाऱ्याची सोय करत असताना दुसरीकडे सामान्य नागरिकांमध्ये बांधकामांच्या दर्जाबाबत अद्याप जनजागृती झालेली नाही. लाखो रुपये ओतून घेतलेले घर किती वर्षे टिकेल याची शाश्‍वती कोणालाही देता येत नाही. दहा-बारा वर्षातच घर जीर्ण वाटायला लागतात.

-Ads-

अनेक विकसित देशांप्रमाणे भारतातही नॅशनल बिल्डिंग कोड आहे. इमारतींच्या विविध प्रक्रिया, तंत्रज्ञान, डिझाइन आणि इंजिनिअरिंगचं मानकं या कोडमध्ये आहेत. अर्थात ही मानकं सक्तीची नसली तरी त्यांच्याप्रमाणे बांधकाम केल्यास इमारतीचा दर्जा दीर्घकाळ टिकतो. मात्र, ही मानकंच पाळली जात नाहीत. बांधकामाच्या दर्जामध्ये त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा महत्त्वाचा वाटा असतो. इमारत कोसळण्याच्या मुंबईसह इतर शहरांतील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम साहित्य तपासणीबाबत बांधकाम व्यावसायिकांमध्ये जागरुकता वाढत आहे. मात्र, या वाढत्या जागरुकतेचा काही प्रयोगशाळांकडून गैरफायदा घेतला जात आहे.

शहरात बांधकाम साहित्य तपासणी करुन देणाऱ्या सुमारे 50 प्रयोगशाळा आहेत. मात्र, त्यापैकी अवघ्या दोन शाळांना नॅशनल एक्रेडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशनचे (एनएबीएल) मानांकन प्राप्त आहेत. शंभर चौरस फुट जागेत प्रयोगशाळा सुरु करुन अहवाल दिले जात आहेत. बांधकाम साहित्य तपासणीसाठी आवश्‍यक तापमान व इतर कोणतेही निकष पाळले जात नाहीत. काही प्रयोगशाळांमध्ये जुजबी तपासणी करुन थातूर-मातूर अहवाल दिले जातात. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. एनएबीएल मानांकनप्राप्त प्रयोगशाळांबाबत बांधकाम व्यावसायिकांमध्यॆेजागरुकता नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. शासकीय यंत्रणा देखील याबाबत अनभिज्ञ असल्याचे अशा प्रयोगशाळांच्या शहरातील वाढत्या संख्येमुळे स्पष्ट होत आहे.

ही बोगसगिरी रोखणार कोण?
काही बांधकाम व्यावसायिक तपासणीसाठी चांगल्या दर्जाचे सिमेंट, माती, खडी, मुरूम, स्टील हे साहित्य पाठवतात. प्रत्यक्षात दुसरेच साहित्य वापरले जाते. हे बांधकाम व्यावसायिक खुबीने प्रयोगशाळांच्या प्रमाणपत्रांचे मार्केटींग करतात. आमचे साहित्य कसे उच्च दर्जाचे आहे हे या प्रमाणपत्रांच्या आधारे पटवून देतात. त्याच्या आधारे महापालिकेकडून बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देखील मिळवला जातो. दुर्देवाने या साहित्याची फेरतपासणी करणारी महापालिकेची कोणतीही यंत्रणा अथवा धोरण नाही. त्यामुळे बांधकाम साहित्याच्या दर्जातील बोगसगिरी रोखणे अवघड झाले आहे.

महापालिकेलाही घ्यावा लागला तो निर्णय
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत उड्डाणपुलाची अनेक कामे सुरू आहेत. रस्ते बांधणीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्यान, विविध कामासाठी इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी बांधकाम साहित्याचा वापर केला जातो. या बांधकाम साहित्याची एनएबीएल मान्यता नसलेल्या प्रयोगशाळांमधून तपासणी करून ठेकेदारांची बिले अदा केली जात होती. तत्कालीन स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून देत महापालिकेच्या वतीने होणाऱ्या सर्व स्थापत्य व इतर कामांमध्ये सर्व बांधकाम साहित्याची तपासणी ही एनएबीएलची मान्यता असलेल्या गुणवत्तापूर्व प्रयोगशाळेतून करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता महापालिकेच्या प्रकल्पांमधील बांधकाम साहित्याची एनएबीएल प्रयोगशाळेमधून तपासणी केल्यानंतरच ठेकेदारांना बिल अदा करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासून घेणे तसेच स्लॅब, कॉलम याचेही टेस्टिंग रिपोर्ट ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास या अहवालाची मदत होत असते. बांधकामाचे आयुर्मान चांगले रहावे यासाठी बांधकाम साहित्याचा दर्जा एनएबीएल मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमधून तपासणे गरजेचे आहे.
– शिरीष पोरेड्डी, प्रवक्‍ते, स्थापत्य विभाग, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)