राजगुरूनगर- कुरकुंडी (ता. खेड) येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अतुल सलगर यांनी तीन वर्षे सक्त मजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अमोल बाळासाहेब जावळे (वय 34, रा. कुरकुंडी ता. खेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची माहिती अशी की, दि. 12 मे 2016 रोजी कुरकुंडी येथे पीडित 13 वर्षीय मुलगी तिचे राहत्या घरात अंघोळ करीत होती. त्यावेळी अमोलहा तिच्याकडे वाईट हेतूने पाहत मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे सुरु केले. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अमोल जावळे विरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला होता.
हा खटला राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश अतुल सलगर यांच्या पुढे सुरु होता. त्याचा निकाल गुरुवारी (दि. 16) त्यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड.गिरीश कोबल यांनी सात साक्षीदार तपासले. पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश सलगर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. या घटनेचा तपास चाकण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राकेश कदम यांनी केला होता. सरकारी वकील ऍड. गिरीश कोबल यांना सरकारी वकील ऍड. मकरंद औरंगाबादकर यांनी सहकार्य केले. न्यायालयीन पोलीस कामकाज राजेंद्र सोनवणे यांनी पाहिले.

  • अशी आहे शिक्षा
    अमोल जावळे यास भादवि कलम 354 (अ) अन्वये 2 वर्षे सक्‍तमजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद, भादवि 354(ब) अन्वये 3 वर्षे सक्‍तमजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद, भादवि 354(क), अन्वये 2 वर्षे सक्‍तमजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12 अन्वये 2 वर्षे सक्‍तमजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस कैद. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्र भोगायच्या असल्याचा आदेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)