विधिमंडळात जोरदार घमासान…

मेस्मा विरोधात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक


विधानसभेचे 8, तर विधानपरिषदेचे 3 वेळा कामकाज तहकूब


सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज बंद

मुंबई – अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायद्याचे समर्थन करणाऱ्या भाजप सरकारविरोधात आज विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद सभागृहात जोरदार घमासान झाले. दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरु होताच शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने घोषणाबाजी करीत सभागृहात गदारोळ घातला. मेस्मा विरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या व्यासपिठावरून जाऊन घोषणा देऊ लागले. या गदारोळात शिवसेनेच्या एका आमदाराने विधानसभेत अध्यक्षाचा राजदंड उचलला.

सभागृहातील गोंधळ शिगेला पोहोचल्याने विधानसभेचे 8 वेळा, तर विधानपरिषदेचे 3 वेळा कामकाज तहकूब झाले. त्यानंतरही सुरु असलेल्या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे शक्‍य नसल्याने अखेर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी बंद करण्यात आले. विधानसभागृहात कामकाज सुरु होताच शिवसेनेचे आमदार विजय औटी यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मासंदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.

अंगणवाडी सेविकांनी आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नावर संप पुकारला असताना त्यांच्यावर मेस्मा कायदा लावणे अन्यायकारक आहे. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता महिला या अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत. या दुबळ्या घटकांवर मेस्मा लावणे हा लोकशाहीचा खून आहे, असा संताप व्यक्त करीत त्यांनी मेस्मा रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळी शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनीही मेस्माविरोधात आवाज उठवला. आपल्या अधिकारांसाठी लोकांनी भूमिकाच घ्यायची नाही काय, असा सवाल करून तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात. त्यांचा रस्त्यावर उतरण्याचा हक्कच मेस्माद्वारे दडपणे हे देशविरोधी कृत्य आहे. उद्या मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यानांही मेस्मा लावणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

नुकताच 8 मार्च रोजी महिला दिन आपण साजरा केला. या अंगणवाडी सेविका देखील 95 ते 97 हजार महिलाच आहेत. दीडशे रूपये रोजावर त्या काम करतात. इतक्‍या पैशांत दोन वेळचे नीट जेवण तरी येते काय, हे सरकार लोकशाहीचा गळा घोटत असून हुकूमशाही सुरू असल्याची टीका अजित पवार यांनी यावेळी केली.

सभागृहातील 288 पैकी 155 आमदार मेस्मा हटविण्याची मागणी करत आहेत. तेव्हा सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)