संग्रहित छायाचित्र

भाजपामध्ये तिकिटासाठी चढाओढ : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता

मुंबई – राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केली आहे. एका जागेसाठी 3 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतदानानंतर सायंकाळी निकाल जाहिर केला जाणार आहे. विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. परंतु, 31 मे 2018 रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाल 24 एप्रिल 2020 पर्यंत राहणार आहे.

या पोटनिवडणुकीसाठी 14 सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. 22 सप्टेंबरपर्यंत उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 26 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 ऑक्‍टोबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

विधानसभेत सध्या भाजपचे बहुमत आहे. विधानसभेत भाजपाचे सदस्य सर्वात जास्त असल्यामुळे इतर कोणताही पक्ष या पोनिवडणुकीसाठी आपला उमेदवार देण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्‍यता जास्त आहे. पर्यायाने भाजपामध्ये आता तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)