विधानसभेसाठी दोन्ही नेत्यांनी बांधला चंग

जाहीर सभांवर भर; कोण बाजी मारणार याकडे लक्ष

पाटण तालुका राजकीय वार्तापत्र

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सूर्यकांत पाटणकर

पाटण –
पाटण विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी चंग बांधला आहे. मतदारांसह कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. 2019 च्या विधानसभेची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी आव्हानात्मक असून बाजी कोण मारणार? याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

पाटण विधानसभेची निवडणूक गत विधानसभा निवडणुकीपेक्षा खडतर होणार असल्याची जाणीव तालुक्‍यातील दोन्ही नेत्यांना झाली आहे. तालुक्‍यात पक्षापेक्षा गटा-तटांना महत्व असून दोन्हीही गट निवणुकीसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गटातील कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जाहीर कार्यक्रमांची आवश्‍यकता असते. हेच ओळखून राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर व सेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी जंगी जाहीर कार्यक्रम घेवून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा इशारा दिला आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. गत विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यानंतर तालुक्‍यात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आमदार शंभूराज देसाई यांना चितपट केल्याचे त्यांनी जाहिर सभेत सांगितले. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आमदार शंभूराज देसाई यांना पराभूत करु, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या भाषणाचे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. सभेसाठी महिला व युवकांची असणारी उपस्थिती लक्षणीय असल्याने राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असल्याचे या कार्यक्रमामुळे अधोरेखित झाले.

पाटणच्या कार्यक्रमानंतर मरळीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीची जय्यत तयारी कारखान्यावर सुरु झाली. मात्र सभेला कोणाला निमंत्रित करायचे हा विचार करत असतानाच आमदार शंभूराज देसाई यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतला. राज्यात सेना-भाजपा युतीची कुरबुर असताना भाजपाचे असणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सेनेच्या प्रमुख मंत्रीमहोदयांसह राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना एका व्यासपीठावर बसविण्याची किमया आमदार देसाई यांनी साधली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मुख्यमंत्री महोदयांनी आमदार देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार कसा असावा, याचे उदाहरण देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक कार्यकर्त्यांसाठी चिरंतर प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्‍वास व्यक्‍त करुन मुख्यमंत्री यांनी शंभूराज देसाई यांना माझ्याकडे कामाची मागणी न करता कामाची पत्रे पाठवा, तात्काळ मंजूरी देतो असे म्हणून शंभूराज देसाई यांच्या पाठीशी सदैव असल्याची ग्वाही दिली. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा शंभूराजांना आमदार करा असे आवाहन केले. कार्यक्रमाला आलेल्या सर्वच नेत्यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे कौतुक केले. त्यामुळे आमदार देसाई यांनाही बळ मिळाले. तर मुख्यमंत्री, नेत्यांच्या भाषणाने कार्यकर्तेही चार्ज झाले आहेत.

तालुक्‍यातील दोन्ही नेत्यांनी राज्यातील प्रमुख मंडळींना तालुक्‍यात आणून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निमिर्तीचा प्रयत्न केला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीला अद्याप कालावधी असल्यानेही वातावरण निर्मिती टिकणार का हाही प्रश्‍न आहे. तालुक्‍यात विकासकामांच्या बाबतीत दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विभागवार मिळावे घेतले जात आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांना चार्ज केले जात आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीत बाजी कोण मारणार हे अद्यापही अस्पष्ट असले तरी याची उत्सुकता तालुक्‍यातील जनतेला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)