विधानसभेसाठी जावलीत मोर्चेबांधणी?

आमदारांची हॅट्‌ट्रीकची तयारी सुरु, दीपक पवारांसह अमित कदम अन्‌ शिवसेनेकडूनही गाठीभेटींवर जोर
प्रसाद शेटे
मेढा, दि. 23 – विधानसभा निवडणूक आता 10 महिन्यांवर येऊन ठेपली असताना इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सलग तिसऱ्या वेळी निवडुन येण्याच्या निर्धारासह विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संपूर्ण मतदार संघात लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही माजी सभापती अमित कदम यांना निवडून आणण्यासाठी तालुक्‍यात लक्ष केंद्रीत केले आहे. तर प्रदीर्घ कालावधीनंतर शिवसेनेचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ यांनीही जावळी तालुक्‍यात पुन्हा जोर दिला असून शिवसेनेचे नेते एस. एस. पार्टे गुरुजी यांनीही मतदार संघात संपर्कावर भर दिलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर अगोदरच मतदारांना “उमेदवार आले आपल्या दारी’चा अनुभव येत आहे.
सातारा-जावळी विधान सभा मतदारसंघातील राजकारण आता गतिमान झालेले आहे. लोकसभा निवडणुका 3 महिन्यांवर आलेल्या असल्या तरीही प्रत्यक्षात चर्चा मात्र विधानसभा निवडणुकीची सुरू असल्याचे दिसते. विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले दिवसातून, दोन दिवसांतून एकदा तरी चक्कर मारताना, तर कधी सर्वसामान्यांमध्ये वडापाव खाताना मेढा शहरात दिसून येत आहेत. जोडीला लोकसंपर्क हीच आमदारांची मोठी शक्ती आहे, त्याचबरोबर विकासकामांकडे लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे माजी सभापती अमित कदम यांनी कोटींचा खासदार निधी आणून मतदारांचे लक्ष आमदारांवरून आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. तर आमदारांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले जि. प. सदस्य दीपक पवार मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जमेल त्या सर्वप्रकारे सातारा-जावळी तालुक्‍यात आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न पवारांनी चालवला आहे.
जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर जावळी तालुक्‍यातील आपल्या भागातील ठिकाणांची वोट बॅंक सुरक्षित असल्यामुळे पवारांनी सातारा-मेढा-सातारा करत आपला तळ ठोकला आहे.तसेच शिवसेनेच्या उमेदवाराची माळा कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत ही चर्चा सुरू असून पार्टे गुरुजींच्या नावाची मागणी जोर धरत असली तरी निवडणुकीवेळी युती होऊन दीपक पवारांनाच युतीची उमेदवारी मिळणार का? हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, युतीची उमेदवारी पवारांना मिळाली तर विद्यमान आमदारांचा मार्ग खडतर होणार आहे. त्याचबरोबर खासदार उदयनराजे यांच्यासह अमित कदम यांचा दौरा आणि विकासकामाची सुरुवात ही आमदार गटासाठी डोकेदुखी ठरणार आहे. या डोकेदुखीसोबतच आमदारांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे हे आपल्या काही चुकांमुळे युवकांच्या मोठा विरोधी गट तयार होण्यास कारणीभूत ठरले आहेत. तालुक्‍यातील काही भागातील युवकांमध्ये रांजणेंबद्दल मोठा रोष आहे. विठ्ठला भोवती जशी बडवे गोळा होतात तसेच आमदारांच्या भोवती जमा झालेले तथाकथित नेत्यांमुळे राष्ट्रवादीचे तालुक्‍यातील युवा कार्यकर्ते पक्षापासून दुरावत चालले आहेत. त्यामुळे आमदारांनी या बाबींकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे किंबहुना याचाही फटका आमदारांना आगामी निवडणुकीत बसू शकते.
मेढा शहरात राजकीय चर्चांना आणि घडामोडीना ऊत आला असून मेढ्यातील राजकारणाची नस आजपर्यंतदेखील कोणत्याच नेत्याला सापडलेली नाही, हे एक त्रिकाल सत्य आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मेढा शहरातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली होती. बाहेरील गावांतील नेत्यांच्या मेढा शहरातील राजकारणात होणारा शिरकाव यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक युवा कार्यकर्त्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे तर राष्ट्रवादीचे स्थानिक दिग्गज नेत्यांनी काही इतर पक्षाच्या नगरसेवकांना दिलेल्या छुप्या पाठिंब्यामुळे नक्की पक्षाची दोर आहे तरी कुणाच्या हातात असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे वीस वर्षानंतर शिवसेना-भाजप विधानसभेला आपला झेंडा रोवणार की मेढा शहर व तालुक्‍यात योग्य ठिकाणी लक्ष केंद्रीत करून आमदार शिवेंद्रराचे भोसले विजयाची हॅट्‌ट्रीक करणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)