विधानसभेची रंगीत तालीम समजून कामाला लागा

आ. मकरंद पाटील : राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणार
वाई, दि. 19 (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत सातारा मतदार संघातून खा. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी वाई तालुक्‍यातील राष्ट्रवादी पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभेची रंगीत तालीम समजून कामाला लागायचे आदेश आ. मकरंद पाटील यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. वाई तालुक्‍यातून खा. उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्‍य देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
आढावा बैठकीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक दासबाबू गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीपबाबा पिसाळ, प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी, मदन भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष रमेश गायकवाड, भूषण गायकवाड, राजाभाऊ खरात, ऍड. श्रीकांत चव्हाण, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव सरकाळे, डॉ. अमर जमदाडे, बापूसाहेब जमदाडे, नगरसेवक प्रदीप चोरगे, राजेश गुरव, यशवंत जमदाडे, निखील सोनावणे, राजेंद्र तांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. मकरंद पाटील म्हणाले, संपूर्ण देशासह, महाराष्ट्रात सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधून ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, सध्या राजकारणात बंडाळीचे पिक उफाळून आले असून फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशावेळी कोणताही किंतु मनात न आणता पक्षाची ताकद वाढवून जास्तीत-जास्त मताधिक्‍य देवून आपल्या मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून शरद पवार यांच्या विचारांची सत्ता देशासह महाराष्ट्रात येण्यासाठी जास्ती-जास्त खासदार निवडून आणण्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम समजून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाल लागावे. तसेच देशात व राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षांमध्ये युती झाल्याने मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक यापुढे देण्यात येईल असेही आमदार पाटील यांनी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)