“विधानभवन’ आहे की “प्राणीसंग्रहालय’

प्रश्‍न उपस्थित करत अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
………………..
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 – ज्या विधानभवनात आपण कायदे करतो, राज्याचा कारभार चालवतो, जाती-धर्माला न्याय देण्याची भूमिका घेतली जाते, त्याच ठिकाणी उंदीर, मांजर, वाघ, सिंह यावर आठ-आठ दिवस चर्चा केली जाते. खुशाल प्राणीसंग्रहालयात असल्यासारखे भाषण करतात, असा सत्ताधाऱ्यांना टोला लगावत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे “विधानभवन’ आहे की “प्राणीसंग्रहालय’ अशा प्रश्‍न उपस्थित केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हा हल्लाबोल करत, हे सरकार सत्तेवर आल्यापासून वारंवार घोटाळे करत आहे आणि मुख्यमंत्री सगळ्यांना क्‍लिनचिट देत फिरत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तुरडाळ खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आम्ही वेळोवेळी निदर्शनास आणून दिला. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी असा काही घोटाळा झालाच नसल्याचे सांगितले. मात्र, आता कॅकच्या अहवालामध्ये तुरडाळीच्या खरेदीमध्ये काळबेर असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याचबरोबर उंदीर मारणे, चहा, चिक्की, आदिवासींसाठी साहित्य खरेदी, शिक्षक संदर्भातील तैलचित्र खरेदी असे विविध घोटाळे समोर आले आहे; तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना समाधानकारक मानधन नाही, मेस्मा ठेवायचा की नाही तसेच शिक्षक भरती, परिक्षांचे निकाल, नोकरभरती असे विविध प्रश्‍न उभे असताना सरकार त्यावर काहीच बोलत नाही.

प्रत्येकवेळी करू, पाहू अशी उत्तरे दिली जातात. चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यावर बदल्या सुरू आहेत; तर काही अधिकारी घोटाळेबाज असले तरी त्यांची त्याचठिकाणी नेमणूक केली जाते. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे सध्या या सरकारचे षड्‌यंत्र सुरू आहे. सहकारमंत्र्यांना काय विचारले तर मी काय बोलू असे म्हणतात. त्यांचे एकच काम “मुक’मोर्चे आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे, शहराचे नुकसान होत आहे. सरकारच्या नाकरतेपणामुळे सगळे घटक अडचणीत आले असून, त्यांच्या विरोधात जनमानसांमध्ये अवस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला पर्याय हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच आहे, हे जनसामान्यांमध्ये बिंबवावे लागणार आहे. दरम्यान, या सरकारचा गलथान कारभार जनता पाहात असून, योग्यवेळ आल्यावर ही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे पवार यांनी सांगितले.
……………………
निलंगेकर हा न्याय तर सर्वसामान्यांना का नाही?
कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांचे 78 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांना वन टाईम सेटलमेंट 25 कोटी भरायला लावले. बाकीचे कर्ज माफ? हा कुठला न्याय, ते काय सरकारचा जावई आहे का? असा प्रश्‍न अजित पवार यांनी उपस्थित केला. कामगारमंत्र्याला हा न्याय तर सर्वसामान्यांना का नाही. माझ्या शेतकऱ्याचे 78 हजार रुपये कर्ज असेल तर त्याच्याकडून 25 हजार रुपये घ्या आणि बाकीचे कर्ज माफ करा. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे घर अग्निशामकाचे आरक्षण असलेल्या जागेत आहे. सुभाष देसाई यांनी किती तरी हजार एकर जमीन एमआयडीसीला सोडली. जयकुमार रावळ यांना क्‍लिन चिट दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले तर “ते सगळे नियमात आहे’ असे म्हणतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)