विद्यालये “सीसीटिव्ही कॅमेऱ्या’च्या “कक्षे’बाहेर

प्रशांत घाडगे

पिंपरी – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्‍यकता आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळा अजूनही “सीसीटीव्ही’च्या प्रतिक्षेत आहेत. तसेच, महापालिकेच्या प्राथमिक विभागातील शाळांमध्ये मागील वर्षी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. यामुळे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसात खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार सुरु आहेत. या विकृत घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. याचबरोबर, प्राथमिक विभागात 87 शाळा असून त्यासाठी 350 हून अधिक कॅमेरे मागील वर्षी बसविण्यात आले होते. मात्र, काही शाळांमधील कॅमेऱ्यांची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. चांगल्या दर्जाचे कॅमेरे कमीत-कमी चार ते पाच वर्ष टिकतात. मात्र, मागील वर्षी बसविलेले कॅमेरे यंदा बंद पडल्याने त्यांची गुणवत्ता कशा पध्दतीची होती याची कल्पना येत आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प मांडताना शिक्षण विभागासाठी भरघोस योजना जाहीर केल्या जातात. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच, काही योजना आवश्‍यक नसूनही मांडल्या जातात. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता व सतत होत असलेल्या विकृत घटना रोखण्यासाठी शहरातील शाळांमध्ये किमान तीन ते चार कॅमेरे आवश्‍यक आहेत. मात्र, काही शाळांमध्ये कॅमेरे केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्‍नाबाबत महापालिकेने कोणतीही तडजोड न करता लवकरात-लवकर नादुरुस्त कॅमेरे नव्याने बसवावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

माध्यमिक विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत विद्युत विभागाशी चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने कॅमेरे बसविण्यात आले नसल्याची माहिती, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.

 

प्राथमिक विभागातील शाळा : 87
माध्यमिक विभाग : 18
उर्दू माध्यम : 14
हिंदी माध्यम : 2
इंग्रजी माध्यम : 2
एकूण शाळा : 123
विद्यार्थ्यांची एकूण संख्या : 37,851

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)