विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होतोय

तळेगाव-दाभाडे : काकडे यांचा सत्कार करताना माजी आमदार कृष्णराव भेगडे व मान्यवर.
  • कृष्णराव भेगडे यांचे मत : इंद्रायणी विद्या मंदिरचा सुवर्ण महोत्सव

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव हे मावळ तालुक्‍यातील शिक्षणाचे माहेरघर आहे. विविध संस्थांमधील पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तीमत्वात सकारात्मक बदल होत आहेत. संस्था चालक आणि प्राध्यापकांना त्याचे श्रेय जाते, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिरचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यवाह रामदास काकडे यांनी यशोदाबाई काकडे यांच्या स्मरणार्थ विज्ञान शाखेची इमारत स्वखर्चाने बांधून देण्याचा संकल्प त्यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीर केला. रामदास काकडे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त संस्थेतर्फे कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे खजिनदार केशवराव वाडेकर, नगरसेविका वैशाली दाभाडे, अण्णासाहेब दाभाडे, दत्तात्रय तांबोळी उपस्थित होते.

कृष्णराव भेगडे यांनी विविध शैक्षणिक संस्थांच्या कार्यसिद्धीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, इंद्रायणी विद्या मंदिरचे कार्यवाह म्हणून रामदास काकडे यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेले योगदान पाहाता संस्थेस उत्तम उत्तराधिकारी मिळाला आहे. द्रष्टेपणाने काम करणारा नेता असा त्यांचा लौकिक आहे. केशवराव वाडेकर यांनीही काकडे यांच्याबद्दल गौरोद्‌गार काढले. नगरसेविका वैशाली दाभाडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन, प्रा. जी. एस. शिंदे, उपप्राचार्य ओव्हाळ यांनी शुभेच्छा दिल्या.

सत्कारास उत्तर देताना रामदास काकडे म्हणाले की, संस्था हे माझे घर समजून काम केल्याने माणसे जोडत गेलो. संघ भावनेने सर्वांनी त्यास प्रतिसाद दिला. इंद्रायणी महाविद्यालयातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांत सकारात्मकता दिसत आहे. येत्या आठ दिवसात आईच्या स्मरणार्थ विज्ञान शाखेच्या इमारतीचे काम सुरू होईल. भेगडे आणि वाडेकर यांच्या अनुभवाचा आशीर्वाद असल्याने आपण प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकलो. प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य एस. के. मलघे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथालय प्रमुख डी. आर. साबळे यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)