विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनाही इंटर्नशिपची गरज

अमित कोल्हे यांचे मत; उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थांनी अभ्यासक्रमात बदल करावा
नगर – अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या 40टक्के युवकांनाच रोजगार मिळतो. त्यामुळे अलिकडच्या काळात अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. त्यातून मार्ग काढायचा असेल, तर उद्योगाला ज्या गुणवत्तेचे विद्यार्थी लागतात, त्या गुणवत्तेचे विद्यार्थी घडविण्यावर शिक्षण संस्थांचा भर असला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी अभ्यासक्रमात बदल करण्याचे धाडस केले पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापकांनीही सुटीच्या काळात उद्योगांत जाऊन इंटर्नशिप करण्याची आवश्‍यकता आहे. केवळ नोकरी करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची मानसिकता बदलून नोकरी देणारे हात तयार करावे लागतील, असे मत संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमितदादा कोल्हे यांनी व्यक्त केले.
सध्या अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एआयसीटीईच्या निकषानुसार अभियांत्रिकीची पदवी मिळालेल्यांपैकी 40 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, तर दुसरीकडे उद्योजकांना चांगले अभियंते मिळत नाही, अशी तक्रार आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हे यांनी “दैनिक प्रभात’ ला दिलेल्या खास मुलाखतीत अभियांत्रिकी शिक्षणापुढचे आव्हान, जागतिक स्पर्धा आणि नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठीची उपाययोजना आदींवर भर दिला. कोल्हे म्हणाले, की विद्यापीठे अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम ठरवीत असली, तरी त्यात बदल करू नये, असे काही बंधन नाही. उद्योगांची गरज लक्षात घेऊन काही अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे शक्‍य आहे. उद्योग व शिक्षणसंस्थांमध्ये फार मोठी दरी आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मुलांना मूलभूत शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. मुलांना थिअरॉटिकल शिक्षण भरपूर मिळते; परंतु प्रत्यक्षातला अनुभव कमी पडतो. त्यासाठी उद्योग व संस्थांमध्ये सातत्याने संवाद असायला हवा. सध्याचा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजिन्सचा आहे. क्वाटंम इंजिनिअरींगचा आहे. रोबोटिक्‍सचा आहे. ही सारी आव्हाने लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान मिळायला हवे. अभियांत्रिकीच्या शिक्षणात जगभर काय चालले आहे, त्याची माहिती घेऊन आपणही तसे बदल करायला हवेत.
भारतातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी परदेशी संस्थांशी करार केल्याचा काही प्रमाणात फायदा होऊन तिकडे काय चालले आहे, याचे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना मिळायला लागले आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे (एआयसीटीई) च्या आकडेवारीनुसार प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अंतिम वर्षात फक्‍त 42 टक्‍केच उत्तीर्ण होतात. प्रथम वर्षाच्या एकूण प्रवेश क्षमतेच्या 52 टक्‍के जागा संपूर्ण देशात रिक्‍त रहात आहेत. शासकीय संस्थामध्येही 28 टक्‍के जागा रिक्‍त आहेत. ही गंभीर बाब आहे, असे निदर्शनास आणून ते म्हणाले,”” अनेक संस्थामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्‍त राहत असल्यामुळे अनेक संस्थाचालकांनी संस्था बंद करण्यासाठी एआयसीटीईकडे प्रस्ताव पाठविले आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्या संस्थाचे प्रवेश 30 टक्‍यांपेक्षा कमी आहेत, अशा संस्थांना संस्था बंद करण्याचे आदेश एआयसीटीने दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत देशातील 1940 संस्थांमध्ये क्षमतेच्या 30 टक्‍यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. पदवी/पदविका पूर्ण केल्यानंतर रोजगार मिळत नाही, त्यामुळे प्रवेश क्षमता पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम संस्थांची आर्थिक स्थिती ढासळण्यावर होतो. संस्था अनुभवी प्राध्यापकांची नेमणूक करू शकत नाही. आधुनिक प्रयोगशाळा उभारू शकत नाहीत. शिक्षक हा घटक कोणत्याही शिक्षण संस्थेचा आत्मा असतो. त्यांनी निर्धारित शैक्षणिक अर्हता प्राप्त करून स्वत:ला आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाशी परिचित असणे गरजेचे आहे. शोधनिबंध सादरीकरण, वर्कशॉप/सेमिनार इत्यादींमध्ये प्रत्येक सत्रात किमान एकदा तरी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. एखादा विद्यार्थी अभ्यासात मागे असेल, शिक्षणाविषयी गोडी नसेल अशा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी मनोधैर्य वाढविण्यांचे काम करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना कसे हाताळावे याचे प्रशिक्षण शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विषय शिकविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करावा.”

रोजगारवृद्धीसाठी प्रशिक्षण आवश्‍यक
उन्हाळी सुट्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला इंटर्नशिप/इन्प्लांट ट्रेनिंग सक्‍तीचे करणे गरजेचे आहे. काही उद्योग विद्यार्थ्यांना परवानगी नाकारतात. त्यामुळे सरकारनेच प्रत्येक उद्योजकाला किमान 25 विद्यार्थ्यांना कमीत कमी 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्याचे बंधन घालावे. त्यासाठी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक स्वतंत्र विभाग असावा.
मुलाखत तंत्र शिकवा
काही वेळा विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान असूनदेखील ते मुलाखतीच्या वेळी सादरीकरण अथवा अचूक उत्तर देण्यात कमी पडतात. त्यामुळे संस्थांनी मुलाखतीचे तंत्र, देहबोली, संभाषण कौशल्य, इंटरव्हयू पॅनल प्रती आदर, हजर जबाबीपणा अशा विविध पैलूंची रूजविण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण शिबिरे घ्यावीत. सध्याची यंत्रसामुग्री झाल्याने प्रयोगशाळांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.
ंसंजीवनी जागतिक पातळीवर
गेल्या वर्षात “ट्रेनिंग अँड प्लेसमेंट’ विभागामार्फत देशातील 122 नामांकित कंपन्यांनी 952 विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेतले. दीड लाख रुपये ते नऊ लाख रुपये पॅकेज दिले. व्यावसायिक शिक्षण संस्थेला एनबीए मानांकन मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला 2002 पासून सतत एनबीए (नविदिल्ली) मानांकन मिळते आहे. त्याचप्रमाणे नॅक मानांकनही आहे. बी. फार्मसी महाविद्यालयदेखील एनबीए व नॅक मानांकन प्राप्त आहे. राज्यात केबीपी तंत्रनिकेतन हे पाच विभागाचे एनबीए मानांकन प्राप्त एकमेव तंत्रनिकेतन सरकारच्या धोरणानुसार 2018-19 मध्ये ज्या संस्था एनबीए मानांकित आहेत, अशाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळणार आहेत. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात 53 व्या क्रमांकावर असून संजीवनी बी फार्मसी महाविद्यालय हे केंद्र शासनाच्या मानव व संसाधन विभागाच्या अहवालानुसार देशात 32 वे तर राज्यात 6 व्या क्रमांकावर आहे. संजीवनीने युनिर्व्हसिटी ऑफ लेथ ब्रीज (कॅनडा) पोझनान युनिर्व्हसिटी ऑफ इकॉनॉमिक्‍स (पोलंड) आणि शेनकर कॉलेज ऑफ इंजिनियरींग (इस्त्रायल) यांच्याशी परस्पर सांमजस्य करार केलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)