विद्यार्थ्यांनी योग स्पर्धेत सहभाग घ्यावा

आळेफाटा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने योगासनांचा अभ्यास करून विविध स्तरांवर होणाऱ्या योग स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी व्यक्‍त केले. निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या क्रीडा विभागाच्यावतीने आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव उमेशराज पनेरू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आकुर्डी पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाने पटकावला. द्वितीय क्रमांक शारदानगर बारामती येथील शारदाबाई पवार महाविद्यालयाने तर तृतिय क्रमांक निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाने पटकावला.
स्पर्धेमधे चौदा महाविद्यालयातील एकूण 38 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांची नाशिक येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पंच म्हणून प्रा. भाऊसाहेब थोरात, रूपेश थोपटे, डॉ. गौरी पाटील यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रा. शाकुराव कोरडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश जाधव यांनी केले. तर प्रा. अनिल पडवळ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)