विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळणे आवश्‍यक – राज चौधरी

अखिल भारतीय क्रीडा भारतीतर्फे कबड्डी दिनानिमित्त खेळाडूंचा सत्कार

पुणे – प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या खेळात चमकदार कामगिरी करण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण उपजतच असतात. हे गुण ओळखून त्यांना विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळ कोणता खेळला पाहिजे यावर बंधन नाही. वेगवेगळे खेळ खेळल्याने कोणत्या तरी एका खेळात विद्यार्थी तरबेज होतो. चांगले खेळाडू निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळणे आवश्‍यक आहे, असे मत क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय क्रीडा भारतीतर्फे कबड्डी दिनानिमित्त आज कबड्डीपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा भारती पुणे महानगरचे अध्यक्ष शैलेश आपटे, उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सहमंत्री प्रदीप अष्टपुत्रे, पुणे महानगर शहर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते. यावेळी अप्पा दळवी, रोहन सावंत, शुभम कुंभार, प्रमोद खुले, तुषार चव्हाण, नीलेश काळबेरे, दीक्षा जोरी, रोहिणी अरगडे, धनश्री जोशी, मोहिनी चाफेकर- जोग या कबड्डीपट्टूंचा सन्मान करण्यात आला. प्रदीप अष्टपुत्रे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रदीप अष्टपुत्रे म्हणाले की, भारतात इतर खेळांना चालना मिळते. त्याचबरोबर स्वदेशी खेळाला प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्‍यक आहे. वाढत्या आधुनिकीकरणात मैदानी खेळ कमी होत चालले आहेत. मैदानी खेळांना प्रोत्साहन देत सर्व वयोगटातील नागरिकांनी मैदानावर उतरले पाहिजे, ही आजच्या काळाची गरज आहे. योग, कबड्डी, खो-खो असे खेळ खेळले पाहिजेत.

पुणे कबड्डी प्रीमियर लीग स्पर्धेतील वेगवान पुणे संघाची कर्णधार दीक्षा जोरी म्हणाली, कोणताही खेळ खेळण्यासाठी मेहनत आणि जिद्द लागते. सध्या अनेकजण व्हिडीओ गेम, मोबाईल गेम खेळताना दिसतात. परंतु त्यांनी केवळ बैठे खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला हवे. पालकांनी देखील त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)