विद्यार्थ्यांनी चंगळवादाकडे न जाता ध्येय निश्‍चित करावे : कोकरे

फलटण – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस स्त्री मुक्ती व बालिका दिन म्हणून आज सर्वत्र साजरा होत आहे. महात्मा जोतिरावांकडून घेतलेला शिक्षणाचा वसा समाजासाठी व प्रामुख्याने स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी प्रसंगी अंगावर शेण घेऊन, अनेक अपमान झेलत पुढे नेला. स्त्री शिक्षणाची कवाडे उघडी केली. याचे भान आजच्या विद्यार्थ्यांनी ठेऊन चंगळवादाकडे न जाता आपले ध्येय निश्‍चित करून आत्मविश्‍वासाने वाटचाल करावी, असे प्रतिपादन कथाकथनकार रवींद्र कोकरे यांनी व्यक्त केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित व्याख्यानाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.कोकरे बोलत होते. व्यासपीठावर शाळा समितीच्या अध्यक्षा सौ.अलका बेडकिहाळ, मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे उपस्थित होते. प्रा. कोकरे पुढे म्हणाले, सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे काम सुरु ठेवले. शाळेत जाता येताना कर्मठ लोक त्यांना कधी कधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत. अशा परिस्थितीतही त्या डगमगल्या नाहीत. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज देशाच्या संरक्षण, क्रीडा, कला, वैदकीय आदी सर्वच क्षेत्रात मुलींची कामगिरी अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांनी टीव्ही वरील मालिकांच्या आहारी न जाता व कर्मकांडांत न अडकता शिक्षणाची कास धरावी हे प्रा.कोकरे यांनी आपल्या विनोदी शैलीत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)