विद्यार्थ्यांना मिळणार कचरा कंपोस्टिंगचे ज्ञान

पर्यावरण विषयक नागरी समस्यांबाबत बैठक ः कित्येक मुद्यांवर सकारात्मक चर्चा
पिंपरी – कचरा ही शहरासमोरील सर्वांत मोठ्या समस्यांपैकी एक समस्या आहे. जनजागृतीनेच या समस्येचे निराकारण होऊ शकते, ही बाब सर्वांच्याच ध्यानात आली आहे. कचरा कंपोस्टिंगविषयी शहरातील शाळांमध्ये शिकणाऱ्या साडे तीन लाख विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाल्यास प्रत्येक घरात माहिती पोहचेल आणि जनजागृती होईल, असे विचार पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने एका बैठकीत मांडण्यात आले. यावर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून ऑगस्ट 2018 मध्ये कंपोस्टिंग योजनेबाबत प्रदर्शन होणार असून त्याच माध्यमातून योजना राबविण्याचे पर्यायी मार्ग शोधण्यात येईल असे सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण विषयक नागरी समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या कार्यालयात आयोजित या बैठकीत सुमारे वीस मुद्यांवर चर्चा करण्यात आली आणि या समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. या बैठकीत पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, जलनिःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय भोसले, सहाय्यक आरोग्य अधिकारी जी.एस.देशपांडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी जी.एस.देशपांडे व सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे उपस्थित होते. तसेच पर्यावरण सवंर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, सदस्य गोविंद चितोडकर, हिरामण भुजबळ, पुरुषोत्तम पिंपळे, अनिल दिवाकर, अनघा दिवाकर यांनी विविध समस्या मांडल्या.
कचरा कंपोस्टिंग या विषयावर झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांना जागरुक केल्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल, असे मत विकास पाटील यांनी व्यक्‍त केले. यावर अतिरिक्‍त आयुक्‍तांनी ऑगस्ट मध्यूे होणार असलेल्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. या प्रदर्शनाद्वारे कंपोस्ट योजनेबाबत जनजागृती केली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशी झाडे लावण्याची मागणी
पर्यावरण संवर्धन समितीचे सदस्य हिरामण भुजबळ यांनी कस्पटेवस्ती, ऍम्बियन्स हॉटेल, लक्ष्मीनगर येथील झाडांचा मुद्दा उपस्थित केला. येथे विदेशी झाडे लावण्यात येत आहेत. तसेच उद्यान विभागात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. उद्यान विभाग संबंधित आर्किटेक्‍ट तसेच एनजीओ यांची संयुक्‍त बैठक घेऊन विदेशी झाडे काढण्यात यावीत आणि स्वदेशी झाडे लावावीत अशी मागणी करण्यात आली. याबाबत उद्यान विभागाने पर्यावरण संवर्धन समितीशी चर्चा करून देशी झाडे लावणेबाबत माहिती घेण्यात यावी, अशा सूचना उद्यान विभागास देण्यात आल्या. याव्यतिरिक्‍त मनपा हद्दीतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी झांडाच्या बुंध्यांपर्यंत सिमेंट लावण्यात येऊ नये, याबाबत शहर अभियंता यांचे मार्फत परिपत्रक काढण्यात यावे व केलेल्या कार्यवाही अहवाल द्यावा, अशा सूचना स्थापत्य व बीआरटीएस विभागाला देण्यात आल्या.

पर्यावरण संस्कार केंद्र
विद्यार्थी दशेपासूनच सर्वांवर पर्यावरण संस्कार व्हावेत, यासाठी पर्यावरण संस्कार केंद्र स्थापन करण्याची मागणी होत आहे. याबाबत अतिरिक्‍त आयुक्‍त यांनी पर्यावरण संस्कार केंद्राबाबत ताबा पावती देणेबाबत भूमि व जिंदगी विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना भूमि व जिंदगी विभागास दिल्या आहेत.
नदी प्रदुषणाबाबत सर्वेक्षण
शहरातील नाल्यांमध्ये कारखान्याचे प्रदूषित पाणी सोडले जाते. तसेच औद्योगिक कारखान्यांचे मैलापाणी मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात सोडणेत येते. याबाबत महापालिका काय दक्षता घेते, तसेच संबंधितांवर कोणती कार्यवाही केले जाते अशी विचारणा करण्यात आली. याबाबत दिलेल्या उत्तरात सांगण्यात आले की, जलनिःस्सारण विभागाकडून सर्वेक्षणाचे कामकाज सुरू आहे. एमआयडीसी, एमसीसीआय व एमपीसीबी या संस्थांकडून हे कामकाज होणे अपेक्षित आहे. याकामी आयुक्‍तांच्या स्वाक्षरीने संबंधिताना पत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रयत्न
शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु पावसाचे बहुतेक पाणी वाहून जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उल्लेखनी आहे की पुणे महापालिकेच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी रस्त्यावरील पाणी बोअरमध्ये सोडण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला होता. हा उपक्रम यशस्वी ठरला होता. अशाच प्रकारचे उपक्रम शहरात राबवण्यात यावेत आणि भूगर्भ जलस्तर वाढवण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केली. याबाबत अतिरिक्‍त आयुक्‍त यांनी पाणी पुरवठा विभागास सूचना केल्या की, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सीएसआर अंतर्गत कंपन्यांकडून मिळणे कामी आयुक्‍त यांच्या स्वाक्षरीने पत्र देण्यात यावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)