विद्यार्थ्यांच्या पासेसचे वाढवलेले दर कमी करावे यासाठी एमपीएमएलला सबसिडी देण्याचा विचार करणार – महापौर

पुणे, दि. 20 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या पासेसचे वाढवलेले दर कमी करावे यासाठी पीएमपीएमएल ला सबसिडी देण्याचा विचार करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वाढवलेल्या दराबाबत नाराजी व्यक्त करणारी शाळांची पत्र आपल्याला प्राप्त झाली असून, यावर विचार करावा लागेल, असेही टिळक म्हणाल्या.
यावेळी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या पासची रक्कमेची दरवाढ प्रति किमी 61 रुपयांवरून 141 रुपये करण्यात आली आहे. त्यावरून सुमारे 16 शाळांनी ही बससेवा खंडीत केली आहे. तसेच या रकमेच्या दरवाढीसंदर्भात या शाळांनी महापौरांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे याचा विचार करावाच लागेल असे टिळक म्हणाल्या.
वास्तविक संचालक मंडळाच्या बैठकीत अशा संवेदनशील विषयावर चर्चा होणे आवश्‍यक आहे. मात्र पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे “हा आमचा अंतर्गत प्रशासकीय विषय आहे’ असे सांगत प्रतिनिधींना विश्वासात घेतले गेले नाही, असे टिळक आणि मोहोळ म्हणाले.
या संदर्भात आपण स्वत: मुंढे यांच्याशी फोनवर बोललो आहोत. त्यावर त्यांनी असे सांगितले की, आम्हांला एक फेरी जास्त करावी लागते. त्यामध्ये आमचे नुकसान आहे. महापालिकेकडून सबसिडी मिळाल्यास दर कमी केले जातील.
सबसिडीचा विषय स्थायी समितीमधून मंजूर करून घ्यावा लागणार आहे. त्याविषयी पदाधिकारी, पक्षनेत्यांशी चर्चा करू, असे टिळक म्हणाल्या.
मुंढेंचे धोरणच आडमुठे आहे. ज्या प्रतिनिधींना ते स्थायीच्या बैठकीला पाठवतात त्यांना पूर्ण माहितीही नसते आणि अधिकारही काही नाहीत. त्यामुळे पीएमपीएमएल विषयी आम्हांला काही सूचना करायच्या असतील तरी आम्हांला ते करता येत नसल्याची तक्रार मोहोळ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)