पिंपरी- गेल्या काही दिवसांपासून वाकड येथील एका खासगी शाळेकडून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करत या शाळेवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या पदाधिका-यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी पिंपरी महापालिकेतील शिक्षण विभागासमोर ठिय्या आंदोलन केले . तसेच शाळेची चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासन टाळाटळ करत आहे. पालिकेने तातडीने त्या शाळेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही आंदोलक पालकांनी केली.
महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील शिक्षण विभागासमोर पालकांनी मंगळवारी(दि.27) सकाळी अकरा वाजता ठिय्या मांडला होता. महापालिका जोपर्यंत शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नसल्याची भुमिका पालकांनी घेतली. या आंदोलनात आपचे राज चाकणे, प्रवक्ते मुकुंद किरदत, पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन बेंद्रे, अय्याज सय्यद, महेश बडगिरे, ऍड. उमेश साठे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष बसवराज कणजे आणि पालक पुनित शर्मा, राकेश मठिया सहभागी झाले होते.
आपचे पुणे जिल्हा संघटक राजेश चौधरी म्हणाले, वाकड येथील एक खासगी शाळा आणि पालकांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक शुल्कावरुन वाद सुरु आहे. त्याविरोधात पालक आवाज उठवत आहेत. कायदेशीर कारवाई करु शकत नसल्याने शाळेकडून काही विद्यार्थ्यांना सापत्नपभावाची वागणूक दिली जात आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. विद्यार्थ्यांचा परिक्षेचा निकाल राखून ठेवला जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ एक ते दीड तासच वर्गात बसू दिले जात आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत आहे.
महापालिकेने केवळ शाळेला नोटीस बजावली आहे. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. केवळ चौकशी सुरु असल्याचे सांगितले जाते. चौकशी करण्यास एवढा कालावधी कशासाठी लागत आहे? प्रशासनाने तातडीने शाळेवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली. शिक्षण विभाग जोपर्यंत या मनमानी करणाऱ्या शाळेवर फौजदारी कारवाई करत नाही. तोपर्यंत आम्ही उठणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
शिक्षण विभागाकडून कारवाईसाठी पोलिसांना पत्र
बालशिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याचे पालक शाळेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करू शकत नाही. त्यामुले या शाळेच्या विरोधात पालकांची आलेल्या तक्रारीची दखल घेत, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने या शाळेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याविषयीचे लेखी पत्र वाकड पोलिसांना दिले जाईल. येत्या दोन दिवसांत यावर कार्यवाही होईल, असे आश्वासन प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर पालकांनी हे आंदोलन मागे घेतले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा