विद्यार्थी पासधारकांच्या संख्येत घट

पिंपरी – पीएमपीएमएलकडून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास दिले जातात. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका त्यासाठीचा खर्च पीएमपीएमएलला अदा करत असते. मात्र, डोअर स्टेप सेवा देणाऱ्या खासगी स्कूल बस, रिक्षांची वाढती संख्या तर दुसरीकडे पीएमपीला लागलेले “ब्रेक डाऊन’चे ग्रहण यामुळे विद्यार्थ्यांनी पास योजनेकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. अपेक्षित पास संख्येचा आकडा गाठता येत नसल्याने “पीएमपी’वर पास योजनेसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची मुख्य वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करत आहे. प्रवाशांना जास्तीत-जास्त चांगली वाहतूक व्यवस्था देण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत सुरु असताना त्यात सुधारणा होण्याऐवजी समस्या आणखीनच वाढताना दिसत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल सवलतीच्या दराने पास देते त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, यावर्षी विद्यार्थ्यांना पास सवलतीसाठी वारंवार मुदतवाढ देवूनही गेल्या वर्षीचा पास संख्येंचा आकडा पीएमपीला गाठण्यात आत्तापर्यंत यश आलेले नाही. ऑगस्ट महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना असलेली पास सवलत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवण्यात आली. नंतर आता परत मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑक्‍टोबरपर्यंत विद्यार्थीं सवलतीचे पास मिळवू शकतात.

-Ads-

नादुरुस्त बसेसचे वाढते प्रमाण यामुळे विद्यार्थी पीएमपी बसमधून प्रवास करणे टाळत असल्याचे बोलले जात आहे. वाहतूक कोंडी होवू नये म्हणून पीएमपीने प्रवास करावा असा प्रचार पीएमपी करते मात्र पीएमपीच्याच गाड्या रस्त्यात ब्रेकडाऊन होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बहुतांश नागरिक आणि विद्यार्थ्यांनी पीएमपी प्रवासाला “राम राम’ केल्याचे चित्र आहे. अलिकडच्या काही महिन्यापासून पीएमपीच्या बस शहराच्या अनेक भागात बंद पडल्याचे पहायला मिळत आहे. तर निम्म्या गाड्या नादुरुस्त असल्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत असून प्रवाशांना गर्दीत मुठीत जीव धरुन प्रवास करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यात पीएमपी प्रशासनाला अपयश येत असल्याने प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे.

गत वर्षीची सवलत पास संख्या
100 टक्के सवलत पास संख्या – 6575
25 टक्के पास सवलत संख्या – 6484
पीएमपीला मिळालेले उत्पन्न – 6 कोटी 47 लाख 66 हजार 887 रुपये

या वर्षीची सवलत पास संख्या
100 टक्के सवलत पासधारक संख्या – 6732
25 टक्के पास सवलत पासधारक संख्या – 6179

कोणाला मिळते पास सवलत?
महापालिकेच्या हद्दीतील व महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व अंध व 40 टक्के दिव्यांग असलेल्यांना 100 टक्के सवलतीचे पास पीएमपीकडून मिळतात. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या मात्र खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 टक्के रक्‍कम भरुन एक वर्षासाठीचा पास मिळतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)