विद्यार्थी नापास करण्याला बसणार चाप

शाळांना नववीचा निकाल, फेरपरीक्षेचे नियोजन करण्याचे बंधन

पुणे – शाळांमधील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्‍के लागावा व शाळेचे नाव उंचावत रहावे यासाठी इयत्ता नववीतील अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांना नापास करण्याचा धडाका शाळांकडून लावला जात आहे. या प्रकाराला आळा घाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या असून शाळांना नववीचा निकाल व फेरपरीक्षेचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण ठरविले असून अद्याप या धोरणात बदल झालेला नाही. यामुळे फार हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांना नववीत गेल्यानंतर कठीण प्रसंग ओढावत असतात. यामुळे अभ्यासात फारशी प्रगती नसलेल्या या विद्यार्थ्यांना अनुर्त्तीर्ण करण्यालाच शाळांकडून प्राधान्य देण्यात येत असते. प्रत्येक शाळेत अशी काही ना काही तरी विद्यार्थ्यांची संख्याही आढळून येतच असते. शाळांचा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी हुशार विद्यार्थ्यांनाच परीक्षेला बसविण्याची धडपड शाळांकडून सुरू असते. इयत्ता नववीचे निकाल लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नापासाची प्रकरणे उघड होऊ लागली आहेत. या विद्यार्थ्यांना शाळा बदल्यासही सांगितले जाते. पालकांकडून याबाबत शाळांना जाब विचारला जाणार ही वस्तुस्थिती आहे.

सचिवांच्या आदेशाला केराची टोपली
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश वर्षभरापूर्वीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून शाळांना बजाविण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शाळांकडून गांभीर्याने अंमलबजावणीच केली जात नसल्याची बाब समोर येऊ लागली आहे.

शिक्षण विभाग शाळांकडून आतापर्यंत नववीच्या निकालाची माहिती घेत नव्हता. आता मात्र ही माहिती घेतली जाणार आहे. फेरपरीक्षा घेण्याबाबत शाळांना पुन्हा आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार शाळांनी कामकाज करणे आवश्‍यक आहे.

– मीनाक्षी राऊत, उपसंचालक, पुणे शिक्षण विभाग

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)