विद्यार्थिनीशी चाळे ; शिक्षक गजाआड

पिंपरी – शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करणारा हा शिक्षक गेल्या दोन वर्षांपासून मुलींना त्रास देत होता. शनिवारी दुपारी त्याच्या काळ्या कृत्यास उघडे पाडून त्यास पोलिसांच्या हवाली करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास संत तुकारामनगर येथे उघडकीस आला.

बाळासाहेब मारुती आल्हाट (वय 49, रा. पिंपळेगुरव) असे या शिक्षकाचे नाव आहे. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन पिंपरी पोलिसांनी आल्हाटला बेड्या ठोकल्या. याबाबत 15 वर्षाच्या मुलीने पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी, संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुला- मुलींची शाळा आहे. या शाळेत आरोपी आल्हाट हा शिक्षक म्हणून कार्यरत असून तो इंग्रजी व भूगोल विषय शिकवतो. आल्हाट हा 2015 पासून शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्‍लिल चाळे करत होता. विनाकारण शरीराला स्पर्श करणे, घाणेरडे बोलणे असे प्रकार सुरु होते.

याबाबत दोन दिवसांपूर्वी फिर्यादी मुलीच्या पालकांनी आल्हाट याच्याबाबत शाळेकडे तक्रार केली होती. मुलीचे आई-वडील, सामाजिक कार्यकर्त्या शनिवारी शाळेत दाखल झाल्या. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून आल्हाट याच्याबाबत तक्रार करण्यासाठी घाबरणा-या मुली पुढे आल्या. आल्हाटने तब्बल आठ मुलींना अशा प्रकारे त्रास दिला असल्याची धक्‍कादायक माहिती देखील समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत पुढील तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)