विद्यार्थिनींसाठी जीएसटी कार्यशाळा सीए इंस्टिट्यूट व विद्यापीठाचा उपक्रम

पुणे, दि.27 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, करिअर काऊन्सिलिंग ग्रुप, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्‌स ऑफ इंडिया (आयसीएआय), डब्ल्यूआयआरसी यांच्या वतीने वाणिज्य विद्याशाखेत पदवी (तृतीय वर्ष, बी.कॉम) आणि पदव्युत्तर (एम.कॉम भाग 2) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी “वस्तु व सेवा कर”(जीएसटी) संदर्भात कार्यशाळा आयोजित केली आहे.
“वस्तु व सेवा कर (जीएसटी) – कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थिनींचे सक्षमीकरण’ ही कार्यशाळा गरवारे वाणिज्य महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, नेस वाडिया वाणिज्य महाविद्यालय, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, सेंट मिराज कॉलेज ऑफ गर्ल्स अणि मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा 1 जुलै रोजी होणार आहे. उद्‌घाटनाच्या सत्रास राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे “वेब कास्टिंग’द्वारे संबोधित करणार आहेत. यानंतर प्रत्येक आठवड्यातील शनिवारी (7,14,21,28) सकाळी 8 ते 12 या वेळेत कार्यशाळेतील विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. या विषयांच्या अभ्यासासाठी आवश्‍यक असणारे साहित्य आयसीएआयकडूनच पुरविले जाणार आहे. जुलै महिन्यामध्ये या संघटनेच्या स्थापनेस 70 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिला सक्षमीकरणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार व उपकुलसचिव एम.व्ही. रासवे यांनी दिली.
या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थिनींकडून अल्पोपहार आणि लेखन-साहित्यासाठी 100 रुपये इतके शुल्क आकारले जाईल. विद्यार्थिनींना इनपुट टॅक्‍स क्रेडिट, इन्व्हॉईस अँड रेकॉर्डस्‌, जीएसटी रिटर्न्स, कलेक्‍शन ऑफ जीएसटी आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. या कार्यशाळेसाठी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी त्यांच्या महाविद्यालयात पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थिनींची माहिती महाविद्यालयाच्या लॉग इन आयडीचा वापर करून भरावयाची आहे. या कार्यशाळेमध्ये प्रत्येक महाविद्यालयामधून 10 निवडक मुलींना प्रवेश घेता येणार आहे. या पाच दिवसांच्या कार्यशाळेनंतर विद्यापीठाच्या पाठिंब्याने आयसीएआय या विद्यार्थिनींना जुलै-ऑगस्ट महिन्यामध्येच रोजगाराच्या नवीन संधींचा शोध घेण्यासाठी मदत करणार आहे. याचबरोबर या क्षेत्रातील तज्ज्ञांशीही चर्चा करण्याची संधी या विद्यार्थिनींना मिळवून दिली जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थिनींना “ई-लर्निंग’ प्रशस्तिपत्र दिले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)