विद्यापीठ आरोग्य केंद्राची ’24 तास’ सेवा

कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना दिलासा : तत्काळ उपचारासाठी अत्याधुनिक उपकरणे

– व्यंकटेश भोळा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात आता 24 तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत विद्यार्थी, प्राध्यापक, सेवकांना या सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठात राहणारे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक व त्यांचे कुटुंबीय तेथील आरोग्य केंद्रात प्राथमिक वैद्यकीय उपचार घेतात. त्यामुळे उपचारासाठी बाहेर जावे लागत नाही. नाममात्र शुल्कात सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आरोग्य केंद्रामार्फत होत आहे. मात्र, रुग्ण फारच अत्यस्थ असल्यास त्यावेळेस तत्काळ प्राथमिक उपचार करण्यास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मर्यादा येतात. त्या प्रमाणात अद्ययावत उपकरणे नसल्याने, रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र जावे लागते. विद्यार्थ्यांवर ही वेळ येऊ नये, यासाठी विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राने सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सुमारे 10 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकतात, तर अनेक कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक राहतात. त्या तुलनेत आरोग्य केंद्राची परिस्थिती सुसज्ज नसल्याची टीका वारंवार होत असते. त्यानंतर विद्यापीठाने आरोग्य केंद्रासाठी दीड कोटींची तरतूद केली आहे. त्यात 50 लाख रुपये अत्याधुनिक उपकरणांसाठी आहेत. ही सर्व यंत्रणा आरोग्य केंद्रात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ असला तरी आरोग्य केंद्रात उपचार मिळणार आहेत.

अॅम्ब्युलन्स ठरतेय वरदान…
विद्यापीठात आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत असतात. त्यावेळी काही विद्यार्थी उपोषणही करतात. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना ऐनवेळी उपचाराची गरज भासते. अशा परिस्थितीत उपोषणकर्त्यांना तातडीने आरोग्य केंद्रात नेण्यास वेळ लागतो. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने अॅम्ब्युलन्सची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा योग्य फायदा असून, रुग्णांना तातडीने उपचार करणे सोयीचे होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विद्यापीठातील आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी वेळावेळी होत होती. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पाऊल टाकले आहे. तातडीने प्राथमिक उपचार होण्याच्या दृष्टीने लागणारी सर्व वैद्यकीय उपकरणेही बसविण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार करणे शक्‍य होणार आहे. त्याचे उद्‌घाटन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.
– डॉ. शशिकांत दुधगावकर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र

सुविधा पुढीलप्रमाणे
– पेशंट मॉनिटर
– बेडची व्यवस्था
– फोर्टेबल व्हेंटिलेटर
– अद्ययावत ईसीजी मशीन
– ऑक्‍सिजनची उपलब्धता


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)