विद्यापीठात “युवास्पंदन’ महोत्सव रंगणार

19 ते 23 डिसेंबर दरम्यान युवक महोत्सव


यंदा पहिल्यांदाच महोत्सवाच्या आयोजनाचा बहुमान

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नवी दिल्ली येथील असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या संयुक्‍त विद्यमाने पुणे विद्यापीठात येत्या 19 ते 23 डिसेंबर दरम्यान “युवास्पंदन’ आंतरविद्यापीठीय पश्‍चिम विभाग युवक महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी 1 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असून यासाठी विद्यापीठ प्रायोजकत्व मिळविणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्षापासून लिबरल आर्टसचा अभ्यासक्रमही विद्यापीठात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, महोत्सवाचे संयोजन सचिव व विद्यार्थी विकास मंडळ विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. या सर्वांनीही महोत्सवाविषयीची माहिती दिली. महोत्सवाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यंदा पहिल्यांदाच महोत्सवाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या 4 राज्यांमधील 140 विद्यापीठांतील 2 हजार विद्यार्थी कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहेत. 5 दिवस महोत्सव सुरू राहणार. संगीत, नृत्य, ललित कला, साहित्य अशा 27 विविध कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार असून चारशे संघ यात सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या कामकाजासाठी विविध समित्या स्थापन करून त्याची जबाबदारीही वाटप करण्यात आलेली आहे.

महोत्सवाच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. निवास, भोजन, मंडप व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात येणार आहे. त्यामुळे महोत्सवासाठी प्रायोजकत्व मिळविण्यार भर देण्यात येणार आहे. निधी मिळविण्यासाठी शासनाकडेही पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, असे मत डॉ. करमळकर यांनी व्यक्‍त केले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर स्तरावर लिबरल आर्टसचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इतर विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती घेण्याचेही काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी “युवास्पंदन’ महोत्सव जयपूरला घेण्यात आला होता. आता 34 वा महोत्सव असणार आहे. महोत्सवाच्या अंतर्गत विद्यापीठात 7 केंद्रावर विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महोत्सवातील स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महोत्सवासाठी उत्तम नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

महोत्सव मोठा असल्याने शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, उद्योजक, समाजसेवी संस्था यांच्याकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महोत्सवात स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार असून यात मान्यवर लेखकांच्या लेखांचा समावेश असणार आहे. यासाठी जाहिरातीही घेण्यात येणार आहेत. जनसंपर्क विभागाच्या वतीने 5 दिवस “युवास्पंदन’ नावाचे बुलेटिनही दररोज काढण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

स्पर्धा घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक महोत्सवाचीच मेजवाणी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सिनेकलाकारांच्या चर्चेचा कट्टा हा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. यात विक्रम गोखले, अमोल पालेकर यासारखे अनेक दिग्गज कलाकारांशी चर्चा करण्याचा आनंद लुटता येणार आहे. व्यावसायिक कलाकार कलेचे सादरीकरणही करणार आहेत. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळातील 20 हजार विद्यार्थींना या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे, असे राजेश पांडे यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)