विद्यापीठात मुद्रणालयही आहे बरं का… !

सर्व विभागांना जाणीव करुन देण्याची प्रभारी कुलसचिवांवर वेळ

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांनी विद्यापीठाच्या मुद्रणालयाचा वापर करण्याच्या सूचना प्रभारी कुलसचिवांनी दिल्या असून यानिमित्ताने मुद्रणालयातूनच छपाईची कामे करून घेण्याचे परिपत्रक काढण्याची वेळ विद्यापीठावर का आली असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या परिपत्रकामागील गौडबंगाल मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

“विद्यापीठ मुद्रणालय हा विद्यापीठाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. यात डिटीपी, डिजिटल व ऑफसेट प्रिंटिंग, प्लेक्‍स बॅनर व विविध प्रकारची बायडिंगची कामे चांगल्या पद्धतीने केली जात आहेत. सद्यस्थितीत मुद्रणालयातून योग्य पद्धतीने छपाईची कामे होतात. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांनी छपाईची सर्व कामे विद्यापीठाच्या मुद्रणालयातून किंवा मुद्रणालयामार्फत करून घ्यावीत,’ असे परिपत्रक विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले. त्यावरून सध्या विद्यापीठातील मुद्रणालयावरून चर्चा रंगत आहे. ऑनलाईन प्रक्रियेने छपाईची कामे कमी झाली; याउलट विद्यार्थी संख्या वाढली आहे. आता सुमारे 7 लाख विद्यार्थी विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका छपाईची कामे विद्यापीठ मुद्रणालयामार्फत होत होती. आता फक्‍त पुरवणी उत्तरपत्रिका व प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका एवढीच छपाईची कामे विद्यापीठ मुद्रणालयातून होत आहेत. अन्य उत्तरपत्रिका छपाईचे कामे “टेंडर’द्वारे बाहेरील मुद्रणालयातून होत आहे. त्यासाठी विद्यापीठाला मोठी रक्‍कम मोजावी लागत आहे.
धक्‍कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी विद्यापीठ मुद्रणालयाकडील पुरवणी व प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका छपाईची कामे बाहेरील मुद्रणालयामार्फत करण्याचा प्रयत्न विद्यापीठाचा होता. ही सर्व प्रक्रिया “टेंडर’च्या माध्यमातून काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून करण्याचा घाट रचला जात होता. हा प्रयत्न विद्यापीठाच्या मुद्रणालयाने हाणून पाडला. या सर्व प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाला छपाईचे सर्व कामे विद्यापीठाच्या मुद्रणालयाकडून करण्याचे परिपत्रक काढावे लागले, असेच चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, छपाईचे कामे विद्यापीठ मुद्रणालयातून झाल्यास त्याचा फायदा विद्यापीठास होईल. तांत्रिकदृष्ट्या अथवा वेळेअभावी होऊ न शकणारी छपाईचे कामे मुद्रणालयाच्या देखरेखीखाली आधुनिक तंत्रज्ञानासह कमीत कमी वेळेत व विद्यापीठ मान्य दराने केल्यास विद्यापीठाचा मोठा खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनचे म्हणणे आहे.

विद्यापीठाचे मुद्रणालय दुर्लक्षितच
परीक्षा विभागाच्या उत्तरपत्रिका छपाईची कामे बाहेरील मुद्रणालयाकडून होत आहे. त्यासाठी कोट्यवधीचा रुपयांचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. त्यातच बहुतांश छपाईचे कामे टेंडरद्वारे होत असून, त्यातून काही आर्थिक व्यवहार होत असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्या पार्श्‍वभूूमीवर बाहेरील छपाई कामासाठी कोट्यवधी रुपये देण्यापेक्षा विद्यापीठातील मुद्रणालयात आधुनिक तंत्रज्ञान व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास विद्यापीठाला अशक्‍य नाही. त्यादृष्टीने निर्णय घेण्याऐवजी केवळ टेंडरवर लक्ष केंद्रित केल्याने विद्यापीठाचे मुद्रणालय दुर्लक्षित राहिल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)