विद्यापीठात उभारणार ‘सोशल इनोव्हेशन, आंत्रेप्रेन्युअरशिप लॅब’

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी “सायनोलॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या “लॅब’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विजय खरे यांनी दिली.

समाजामधील विविध आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाययोजनांच्या संकल्पना मांडण्यासाठी ही “लॅब’ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लॅबच्या माध्यमामधून विचार व संकल्पनांच्या आदानप्रदानास वाव मिळणार आहे. याचबरोबर, सोशल इनोव्हेशन व आंत्रेप्रेन्युअरशिप हे दोन घटक केंद्रस्थानी ठेवून नव्या व्यावसायिक संकल्पना मांडण्यासाठी “सायनोलॅब’ हे योग्य व्यासपीठ ठरणार आहे.

जागतिक स्तरावरील या प्रकल्पासाठी युरोपिअन युनियनने 10 लाख युरो इतका निधी संमत केला आहे. सोशल इनोव्हेशन फॉर लोकल इंडियन अँड इस्राइली कम्युनिटीज अँड ग्रॅड्युएट आंत्रेप्रेन्युअर्स (सिलिस) असे युरोपिअन युनियनने मंजुरी दिलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासहित भारतामधील इतर चार संस्थांना सिलिस लॅब उभारण्यासाठी निधी मिळणार आहे. भारतासहित इस्राईलमधील पाच संस्थांचा यामध्ये समावेश आहे. तेल हाई अकॅडेमिक कॉलेज या इस्राईलमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेसही या प्रकल्पाद्वारे निधी दिला जाणार आहे. याशिवाय ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठ, जर्मनीतील बर्लिन टेक्‍निकल विद्यापीठ, क्रोएशियातील युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस आणि पोर्तुगालमधील लिस्बन विद्यापीठ या जगप्रसिद्ध संस्थांनाही सोशल इनोव्हेशनसंदर्भातील संकल्पना मांडण्यासाठी युरोपिअन युनियनकडून आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.

या लॅबच्या माध्यमामधून सौरउर्जा व इतर पर्यायी उर्जा संसाधने, स्वच्छ भारत मोहिम व “मॅन्युएल स्कॅवेंजिंग’ या दोन प्रमुख आव्हानांना प्राधान्य देण्याचे संकेत खरे यांनी दिले. विशेषत: “मॅन्युएल स्कॅवेंजिंग’साठी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध घेणे, हे या लॅबचे एक प्रमुख उद्दिष्ट असेल. यासह इतर क्षेत्रांतील “इनोव्हेटिव्ह’ संकल्पना शोधण्यासाठी विविध स्टार्ट अप्सबरोबर काम करण्याची केंद्राची तयारी असल्याचे खरे यांनी स्पष्ट केले.

“आंत्रेप्रेन्युअरशिप’वर विशेष कार्यशाळा

इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये येत्या 18 एप्रिलला “आंत्रेप्रेन्युअरशिप’ विशेष कार्यशाळा याच पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाच्या कॉन्स्टंझ गेरहार्डस यांचे बिझनेस कॉन्टॅक्‍टस अँड नॉलेज ट्रान्सफर या विषयावर व्याख्यान होणार आहे. याचबरोबर, मेक्‍सिकोतील बूट कॅम्प आयडिया लॅब फॉर आंत्रेप्रेन्युअरशिपचे फर्नांडा गामेझ आणि मॅक्‍स प्लॅसेंसिया हे तज्ज्ञही या कार्यशाळेस संबोधित करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)