विद्यापीठातील रिक्त पदांचा कामांवर ‘ताण’

326 अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त 

राज्य शासनाकडून मान्यताच नाही
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 3 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. विद्यार्थी संख्याही वाढत आहे. याउलट रिक्‍त पदांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळावर विद्यापीठास कामे करावे लागत आहेत. सध्यस्थितीत पुणे विद्यापीठात 326 अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस राज्य शासनाकडून मान्यता न मिळाल्याने जवळपास 30 टक्‍के पदे रिक्‍त असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यापीठाने यापूर्वीच 2013 मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली होती. थोड्या दिवसांत नियुक्‍तीची पत्रे दिले जाणार होती. त्याच कालावधीत आरक्षणाच्या निर्णयावरून ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर अद्यापपर्यंत विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली नाहीत. त्यानंतर ऑक्‍टोबर 2017 मध्ये विद्यापीठाने नव्या आकृतीबंधनुसार आणखी 99 वाढीव पदासह ही पदे भरण्यास मान्यतेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानंतर अद्याप राज्य शासनाकडून पदभरतीस मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे रिक्‍त पदांच्या संख्येत भर पडत आहे. परिणामी, कमी मनुष्यबळावर विद्यापीठाचा कामास गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात साडेसात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी 2009 मध्ये पदे भरण्यात आली होती. त्या कालावधीत आणि आताची स्थितीत विद्यार्थी संख्येत कमालीची तफावत आहे. कमी मनुष्यबळात पुणे, नगर आणि नाशिक कार्यक्षेत्रातील सर्वांचे कामे वेळेत मार्गी लागणे विद्यापीठास अशक्‍य होऊन बसले आहे. दरम्यान, 2014 साली पुणे विद्यापीठाने 224 तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती केली. त्यातील 75 तांत्रिक पदांच्या उमेदवारांची कागदपत्राची पडताळणी करण्यात आली आहे. या पदास वित्त विभागाकडून मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे उर्वरित 149 लिपिक व शिपाई पदास वित्त विभागाकडून परवानगी मिळाली. मात्र, या पदांना राज्य शासनाकडून अंतिम मान्यता मिळाली नाही. अंतिम मान्यतेसाठी शिक्षणमंत्र्यांकडे हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. या पदांनाही लवकरात लवकर मान्यता मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतून होत आहे.

महत्त्वाचे तीनही पदे रिक्‍त
पूर्वेचे ऑक्‍सफर्ड म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे विद्यापीठात तीन संविधानिक पदेच रिक्‍त आहेत. कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, पिठासिन अधिकारी ही पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्‍त आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, न्यायालयीन वादात कुलसचिव पदाची भरती रखडली. देशात गुणवत्तेत दहाव्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठातील तीन महत्त्वाचे पदे रिक्‍त राहाणे ही बाब नक्‍कीच आत्मपरीक्षण करणारी आहे.

विद्यापीठातील मंजूर पदे : 1245
कार्यरत पदे : 919
रिक्‍त पदे : 326

पदे : रिक्‍त संख्या
संविधानिक पदे : 3
गट-अ : 42
गट-ब : 46
गट- क : 130
गट-ड : 105

पुणे विद्यापीठात उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, कक्षाधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, सहायक अभियंता, लेखनिक, शिपाई आदी पदे भरण्यास राज्य शासनाने 2015 पासून बंद केली आहेत. त्याचा विद्यापीठाच्या कामावर परिणाम होत आहे. विद्यापीठ फंडातून पदनिर्मिती करून विद्यापीठाचे कामे वेळेत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राज्य शासनाने पदभरतीस मंजुरी दिल्यास सर्व प्रश्‍न मार्गी लागतील. 

– डॉ. अरविंद शाळिग्राम, प्रभारी कुलसचिव, पुणे विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)