विद्यापीठातील अतिरिक्‍त भत्त्यांची प्रथा बंद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनाव्यतिरिक्‍त दिले जाणारे अतिरिक्‍त भत्ते बंद करण्याची समितीने केलेली शिफारस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्य केली आहे. अतिरिक्‍त भत्ते बंद करण्याची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिल, 2019 पासून केली जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता अतिरिक्‍त भत्त्याची प्रथा संपुष्टात येणार आहे.

पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्‍त दूरध्वनी भत्ता, वाहनभत्ता, सुपरवायझरी भत्ता, परीक्षा विभागात काम करण्याचा गोपनीय भत्ता आदी असंख्य भत्त्यांची खैरात केली जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. याबाबतची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीने या अतिरिक्‍त भत्त्यांची पडताळणी केली असता यातील अनेक भत्ते अतिरिक्‍त ठरत असल्याचे निदर्शनास आले.

ज्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे, त्याच कामासाठी त्यांना पुन्हा अतिरिक्‍त भत्ते देणे नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार हे भत्ते बंद करण्याची शिफारस समितीने केली होती. व्यवस्थापन परिषदेपुढे समितीचा हा अहवाल ठेवण्यात आला. परिषदेने हा अहवाल स्वीकारून त्याची 1 एप्रिल, 2019 पासून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदनाम बदलातील वाढीव वेतन पुढील महिन्यापासून बंद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची मान्यता न घेता परस्पर पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ करून घेतली होती. ही वेतनवाढ थांबवून त्यांना पुन्हा मूळ पदांवर पाठविण्याचे तसेच त्यांच्या वेतनाची वसुली करण्याचे आदेश राज्य शासनाने 17 डिसेंबर रोजी एक परिपत्रक काढून दिले आहेत. मात्र, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करताना पुन्हा वाढीव वेतन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सोमवार (दि. 7) सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांची बैठक झाली. त्यात वाढीव वेतन लगेच कमी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे. पदनाम बदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)