विद्यमानांची वाट बिकट : अन्य युतींचा मिळणार दे धक्का?

– विवेकानंद काटमोरे

हडपसर – हडपसर विधानसभा मतदार संघ हा सध्या भाजपाकडे असला तरी, तो कायमचा त्यांच्याकडे राहील असे नाही. येथील समीकरण हे पक्षावर आधारित नसून माळी आणि मराठा या दोन समाजातील मतांवर अवलंबून आहे. प्रत्येकवेळी वेगळ्या पक्षाचा आमदार येथे निवडून येतो. त्यावेळी नवीन समीकरणे तयार होतात. मात्र, हडपसर विधानसभा मतदार संघाचे समीकरण हे पूर्वीपासून केवळ माळी मराठा यावर अवलंबून राहिले आहे. आणि यावेळी देखील हीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. मोदी लाटेत आमदारपदाची माळ गळ्यात पडलेल्या योगेश टिळेकरांविरूद्ध युतीची चर्चासत्रे घडत असून विद्यमानांना युतीकडून धक्का मिळण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.

नेहमी जातींच्या गणितावर आधारीत निकाल देणाऱ्या या मतदारसंघामध्ये सध्या गाववाले आणि बाहेरचे अशा दोन नवीन प्रकारांचा समावेश झाला आहे. त्यामुळे एक नवीन समीकरण रुजू लागले आहे. कात्रज ते मांजरी बुद्रुक असा पट्टा या मतदार संघात येतो. हडपसरचा भाग या मतदारसंघातील निर्णायक मतदार म्हणून गणला जातो. हडपसर हे या संघातील मध्यवर्ती भाग असला तरी आता पर्यंत 3 आमदार हे कोंढव्यातील निवडून आले आहेत. स्व. विठ्ठल तुपे व बाळासाहेब शिवरकर यांच्यात चुरशीची लढत होत होती. एकदा मराठा तर एकदा माळी समाजाचा आमदार झालेला या संघातील मतदारांनी पहिला आहे. स्व. विठ्ठल तुपे यांच्यानंतर बाळासाहेब शिवरकर निवडून आले. त्यांच्यानंतर मध्यावधी निवडणूक झाल्यावर त्यामध्ये शिवसेनेचे सूर्यकांत लोणकर निवडून आले. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा बाळासाहेब शिवरकर निवडून आले. कॉंग्रेस आणि बाळासाहेब शिवरकर याना डावलून 2009च्या निवडणुकीत शिवसेनेच्या महादेव बाबर यांना नागरिकांनी पसंती दिली.

दिवसेंदिवस हडपसर मध्ये नोकरी व व्यवसायानिमित्त येऊन राहणाऱ्यांची व स्थायिक होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे माळी मराठा या समीकरणाबरोबर गावचा व बाहेरचा हेही समीकरण आता रुजू लागले आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत माळी आणि मराठा हेच समीकरण यशस्वी ठरले. या शिवाय भाजपाची लाटही या वेळी काही प्रमाणात कामी आली असे म्हणावे लागेल. गेल्या काही महिन्यात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे त्यांची कारकीर्द वादात सापडली आहे. परंतु त्यांनी मतदार संघात काही निर्णय चांगले घेतले. रेल्वे उड्डाण पूल, अंडरपास, चौकातील उड्डाण पूल, पर्यायी रस्ते, राष्ट्रीय महामार्ग ,पाणी योजना अशी विकास कामे मार्गी लागत आहेत. पक्षश्रेष्ठीशी असलेली जवळीक नेहमीच त्यांच्या कामी आली असली, तरी पालिका निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक यात पक्षांतर्गत व दुसऱ्या पक्षांचे विरोधकही तयार झाले आहेत.

आगामी निवडणुकीत युती आघाडी झाली तर भाजपा मागे पडू शकते. युती झाल्यावर हा संघ शिवसेनेला दिला जाईल. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये कोणाला उमेदवारावर सर्व अवलंबून आहे. आघाडी आणि युती झाली तर लढत ही दोघातच होणार. आघाडी की युती हा पहिला प्रश्न आहे. त्यांनतर माळी की मराठा , गावचा की बाहेरचा याचा विचार होणार आहे. नोकरी व व्यावसायानिमित्त आलेल्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

वारू रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होण्याची शक्‍यता
सुरुवातीला मोदी लाटेवर निवडून आलेले आमदार म्हणून योगेश टिळेकर यांच्याकडे विरोधकांनी पाहिले. जाहीर कार्यक्रमातून तशी टीकाही केली. मात्र पुढील काही महिन्यातच अनेक वर्षे रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आमदार योगेश टिळेकर यांचे होणारे प्रयत्न, तर कामाचा पाठपुरावा आपल्याच काळात सुरू झाल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माजी आमदार महादेव बाबर यांची घोषणा, त्यांनी तर जाहीर कार्यक्रम आणि बैठकांमध्ये कागदपत्रे सादर केल्याने पुढे श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ती अद्यापही सुरूच आहे. यापेक्षाही सुरू असलेली विकासकामे, मोदी लाट, युती आणि आघाडी या सर्व बाबींवर चर्चा रंगताना हडपसर मतदारसंघात आता एक मोठी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. हडपसर मतदारसंघात आता टिळेकरांविरूद्ध त्यांना सोडून इतरेजण एकत्र येत युती करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. तसे झाले, तर टिळेकरांना आगामी निवडणुकीत नेहमीपेक्षा जास्थ कष्ट घ्यावे लागतील, हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)