विदेश भवनामुळे परराष्ट्रसंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली – सुषमा स्वराज

मुंबई – गतिमान कारभार, लोकाभिमुख व स्वच्छ प्रतिमा या त्रिसुत्राच्या माध्यमातून परराज्यात आणि देशातील नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यात केंद्र शासनाला यश आले आहे. मुंबईमधील विदेश भवनाच्या माध्यमातून परराषट्रसंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार असून देशात गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 235 नवीन पासपोर्ट कार्यालये निर्माण करण्यात आली असल्याचे केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुलातील पहिल्या विदेश भवनाचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) डॉ. विजय कुमार सिंह, दिव-दमण व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वराज म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षात 50 हजार नागरिकांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यात केंदशासनाला यश आले आहे. 2014 पर्यंत केवळ 77 पासपोर्ट कार्यालये देशात होती, मात्र गेल्या सहा महिन्यात यामध्ये तब्बल 235 नवीन पासपोर्ट कार्यालयांची उभारणी केंद्र शासनाने केली आहे. प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारून परराष्ट्रसंबंधीच्या सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. पासपोर्ट कायद्यातील सुधारणा करून त्यातील अनावश्‍यक व अव्यवहारी नियम काढून टाकण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस म्हणाले की, प्रदेश मे विदेश या संकल्पनेतून असे विदेश भवन सर्वप्रथम महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी स्वराज यांचे विशेष आभार मानत मुख्यमंत्री म्हणाले, परराष्ट्रासंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या देशातील पहिले विदेश भवन मुंबईत उभारण्यात आले आहे. कुठल्याही प्रकल्पाची सुरुवात मुंबईतून केली तर ती नक्कीच यशस्वी ठरते. या विदेश भवनाचा राज्यातील जनतेला सर्वाधिक फायदा होणार असून, देशातील पहिल क्षेत्रीय विदेश भवन जगभरात देशाची प्रतिमा उंचावण्याचे काम करेल. केंद्र शासन कसे सहयोगी आहे, हे जग पाहिल. शक्तिशाली राष्ट्र म्हणून देशाची जशी ओळख आहे, तशीच जबाबदार राष्ट्र म्हणूनही यामुळे ओळख निर्माण होईल. राज्याने पासपोर्टसाठी केली जाणारी पोलीस पडताळणीची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यामुळे 24-48 तासांमध्ये पासपोर्ट मिळत आहेत. राज्यातील सर्व पोलीस ठाणी डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ, सीसीआय (कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) व नॅशनल इन्फॉरमॅटिक सेंटरद्वारे ई-सनद सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. पासपोर्टच्या दृष्टीने ही सेवा महत्वाची आहे. यामुळे कागदपत्रांची पडताळणी व ती स्वाक्षांकित करण्याची प्रक्रियादेखील ऑनलाइन झाली आहे. यासाठी www.esanad.nic.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)