विदेशरंग: सायबर हस्तक्षेप – न फिटणारे संशयाचे जाळे

देविदास देशपांडे

बहुतांश अमेरिकी नागरिकांचे बातम्यांसाठी फेसबुक हे पसंतीचे माध्यम आहे. जवळपास 43 टक्के नागरिक फेसबुकवरून बातम्या पाहतात. त्यानंतर युट्यूब (21 टक्‍के) व नंतर ट्विटरचा क्रमांक (12 टक्‍के) येतो. नेमका याचाच फायदा घेऊन रशियन सायबर हस्तकांनी अमेरिकेत गोंधळ माजविला आणि खोट्या बातम्यांच्या आधारे मतदारांना भुरळ पाडली, असे ट्रम्प यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे. या संदर्भात अमेरिकी सरकारने केलेल्या चौकशीत अद्याप काही निष्कर्ष निघालेला नाही. मात्र, संशयाचे ढग विरण्याचे नाव घेत नाहीत. आधुनिक जीवनाच्या वरदानासोबत आलेला हा शाप आहे, तो भोगावाच लागेल.

वर्ष 1991 मध्ये रशियातील सोव्हिएत संघराज्य कोसळले. त्यापूर्वीच्या तेथील व्यवस्थेबाबत असे म्हणतात, की तिथे केजीबी या गुप्तचर संस्थेच्या एजंटांचा सुळसुळाट होता. प्रत्येक व्यक्तीच्या चालण्या-बोलण्याची, प्रत्येक हालचालीची नोंद करण्यात येत होती. तेव्हाचे संशयाचे वातावरण एवढे गर्द झाले होते, एका व्यक्‍तीला दुसऱ्या व्यक्‍तीशी मनमोकळे बोलण्याचीसुद्धा मुभा राहिली नव्हती. सोव्हिएत संघराज्याच्या पतनानंतर शीतयुद्ध संपुष्टात आले आणि संशयाच्या गाठी मोकळ्या झाल्या. लोक एकमेकांशी संवाद साधू लागले. एकेकाळची शत्रूराष्ट्रे मित्र बनली. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हा संवाद जागतिक पातळीवर पोहोचला. मात्र शीतयुद्धानंतर महासत्तांची मागे पडलेली सत्ताकांक्षा पुन्हा उफाळून आली. त्यातून तंत्रज्ञानाच्या आधारे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या जमान्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले. अन्‌ या शीतयुद्धाची वाच्यता झाली 2016 साली झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व तज्ज्ञ आणि विचारवंतांच्या मतांवर मात करत जनतेची पसंती मिळविली. त्यांच्या विरोधकांच्या हे पचनी पडले नाही आणि सुरू झाला एक संशय-प्रतिसंशयाचा खेळ. ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आल्यापासून अमेरिकी व्यवस्थेत रशियन हॅकरचा प्रवेश आणि अमेरिकेची राजकीय व लष्करी व्यवस्थेतील त्यांचा हस्तक्षेप हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला. सध्याचे युग हे माहिती युग असल्याचे म्हटले जाते, याचे कारण म्हणजे आपल्यावर माहिती चोहोबाजूने कोसळत असते. मात्र, या बातमीचा, या माहितीचा किंवा दस्तावेजाचा खरेपणा किती याबाबत प्रत्येकाला शंका यावी अशी परिस्थिती आहे. याचाच फायदा घेऊन रशियाने एक माहितीयुद्ध उभे केले आहे आणि त्यातूनच 2016 सालची निवडणूक फिरविण्यात आली, असा ट्रम्पविरोधकांचा आरोप आहे.

गेल्या दोन वर्षातील बहुतेक चर्चा याच दिशेने राहिलेल्या आहे. रशियाने मोठ्या संख्येने सायबर आर्मी उभारली आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, हे बहुतेक सर्व सुरक्षा तज्ज्ञांनी सांगून झाले आहे. मात्र असा इशारा देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेतच रशियन हस्तक असतील तर? नेमकी अशीच परिस्थिती सध्या अमेरिकेत उभी राहिली आहे.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात न्यू नॉलेज नावाच्या एका कंपनीने अमेरिकी लोकांना देशातील निवडणुकीत रशियाकडून हस्तक्षेप होण्याच्या प्रयत्नांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला होता. या महिन्यात सदरची कंपनी नेमकी हेच काम करत असल्याचे उघड झाले आहे. या गौप्यस्फोटामुळे गोंधळाच्या वातावरणात भर पडली आहे. त्यामुळे विश्‍वास कोणावर ठेवावा आणि कोणाच्या मागे जावे, याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्यास त्यात आश्‍चर्य नाही.

रायान फॉक्‍स आणि जोनाथन मॉर्गन हे या कंपनीचे कर्तेधर्ते होत. ऑनलाइन दुष्प्रचारावर आपण लक्ष ठेवत असल्याचा त्यांचा दावा होता. न्यूयॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध वृत्तपत्रात 6 नोव्हेंबर रोजी या दोघांनी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी रशियन हस्तकांपासून आणि अमेरिकेतील निवडणुकांवर प्रभाव टाकण्याच्या त्यांच्या प्रयत्नांपासून सावध राहण्यास लोकांना सांगितले होते. फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांनी जाहीर केल्यापेक्षा किंवा अन्य संशोधकांनी शोधलेल्या प्रयत्नांपेक्षा रशियन बाजूने कित्येक पट अधिक प्रयत्न झाल्याचा दावा या दोघांनी केला होता. एवढेच कशाला, या दोघांनी सिनेट इंटेलिजन्स कमिटीच्या वतीने अमेरिकी लोकशाहीत ढवळाढवळ करण्याच्या रशियाच्या प्रयत्नांबाबत एका अहवालाचे लेखनही केले होते. रशियाचे हे प्रयत्न म्हणजे अमेरिकी नागरिकांविरुद्ध अपप्रचाराचे युद्ध आहे (प्रपोगंडा वार) असा दावा त्यांनी केला होता. लाखो किंवा कदाचित कोट्यवधी अमेरिकी नागरिक या रशियन कारवायांना बळी पडले आहेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

मात्र, या आठवड्यात आलेल्या बातमीमुळे या कंपनीचे आणि पर्यायाने त्या दोघांचेही पितळ उघडे पडले. न्यू नॉलेज कंपनीने स्वतःच एक अपप्रचाराचे अभियान राबविले होते. त्या अंतर्गत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉय मूर हे रशियाच्या पसंतीचे उमेदवार आहेत हे दाखविण्यासाठी खोटे रशियन बॉट न्यू नॉलेज’ने उभे केले, असे समोर आले आहे. रॉय मूर हे सिनेटसाठी अलाबामा प्रांतातून 2017 मध्ये निवडणूक लढवत होते.

ज्या न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने दोन महिन्यांपूर्वी या दोघांचा लेख छापला होता त्याच वृत्तपत्राने त्यांचे बिंग फोडले. न्यू नॉलेजने खोटे रशियन बॉट आणि फेसबुक ग्रुप यांचे एक जाळेच निर्माण केले. त्याअंतर्गत रशियन नावे असलेल्या खात्यांना मूर यांना फॉलो करायला लावले. मूर यांची प्रचार मोहीम ही सोशल मीडियावर रशियन बॉट्‌सनी फुगविली असल्याचे चित्र निर्माण करण्याची सुनियोजित मोहीम न्यू नॉलेजने राबविली, असे कंपनीच्या अंतर्गत मेमोत म्हटले होते. अलाबामातील या आगळीकीबद्दल फेसबुकने मॉर्गनचे फेसबुक खाते काढून टाकले आहे. अर्थात न्यू नॉलेज आणि न्यूयॉर्क टाइम्स या दोघांनी ही मोहीम म्हणजे केवळ एक छोटा प्रयोग असल्याचे म्हटले होते. रशियन हस्तकांचे प्रयत्न नक्की चालतात तरी कसे, हे पाहण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला, असे ते सांगतात. या योजनेला त्यांनी “प्रोजेक्‍ट बर्मिगहॅम’ असे नाव दिले होते. तसेच यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवर काहीही परिणाम झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला.

लिंक्‍डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन या अब्जाधीश व्यावसायिकाने या प्रयोगासाठी निधी पुरवठा केला होता. आता हॉफमन यांनीही हात झटकले आहेत. अमेरिकन एंगेजमेंट टेक्‍नॉलॉजीज (एईटी) या कंपनीला हॉफमन यांनी 750,000 डॉलर दिले होते. त्यातील एक लाख डॉलर्स एईटीने “न्यू नॉलेज’च्या प्रयोगासाठी दिले होते. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर हॉफमन यांनी जाहीर माफी मागितली असून, “हा सर्व प्रकार अस्वस्थ करणारा असून हा पैसा तसा वापरण्यात आला, हे आपल्याला माहीत नव्हते,’ असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेसारख्या आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्य्‌ा पुढारलेल्या समाजात सोशल मीडिया लोकांच्या मतांना दिशा देणारे प्रमुख साधन बनले आहे. “न्यू रिसर्च सेंटर’ या आघाडीच्या संस्थेने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 68 टक्के नागरिक सोशल मीडियावरूनच बातम्या मिळवतात. त्यातील बहुतांश लोकांनी त्या बातम्यांच्या खरेपणाबाबत शंका व्यक्त केली आहे. ही पाहणी 30 जुलै ते 12 ऑगस्ट 2018 या काळात करण्यात आली. या सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या 57 टक्के जणांनी सोशल मीडियावर ते ज्या बातम्या पाहतात त्या खऱ्या नसल्याची शंका जाणवत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच सायबर हस्तक्षेपाबाबत संशयाचे धुके कायम रहाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)