विदेशरंग : भारत-जपान संबंधांना बुलेट वेग 

स्वप्निल श्रोत्री 

भारत व जपान या दोन्ही देशांत अनेक मतभेद आहेत. परंतु, ते चर्चेच्या व्यासपीठावरून सोडविणे सहज शक्‍य आहे. फक्‍त या दोन्ही देशांनी विकास, आश्‍वासने व सहकार्याचे कागदी घोडे न नाचविता प्रत्यक्ष कृती करावी. एवढीच दोन्ही देशांच्या जनतेकडून अपेक्षा असणार. 

नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दोन दिवसात मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, विभागीय आणि हिंदी – प्रशांत महासागर क्षेत्रातील अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर अतिवेगवान (बुलेट) रेल्वे, व्यापार, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, सीमा सुरक्षा यांसारख्या अनेक विषयांसंबंधी दोन्ही देशात करार केले. गेल्या वर्षी ह्याच वेळी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारत दौऱ्यावर आले होते. वर्ष 2006 पासून सुरू झालेल्या भारत-जपान वार्षिक बैठकीचे हे तेरावे वर्ष होते. भारत व जपान ही दोन राष्ट्रे अनेक बाबतींमध्ये समान व एकमेकांना पूरक आहेत.

जपान हा एक लोकशाहीप्रधान देश आहे. तर, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. जपानमध्ये बौद्ध धर्माचे पालन केले जाते. तर, भारत हे बौद्ध धर्माचे उगमस्थान आहे. सध्या जपानमध्ये नागरिकांचे सरासरी वय हे 48 ते 50 च्या दरम्यान आहे. तर, भारतातील तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जपानमध्ये उद्योगधंदे चालवण्यासाठी भारत जपानला मोठ्या प्रमाणावर कुशल कारागिरांचा पुरवठा करू शकतो. तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात जपानची कुशलता आहे. भरपूर पैसा आहे. त्याचा उपयोग भारताच्या विकासासाठी होऊ शकतो.

याशिवाय भारत-जपान यांच्या संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीन हे आहे. गेल्या 15 वर्षांत चीन ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःला प्रोजेक्‍ट करत आहे; त्यामुळे भारत व जपान ही दोन राष्ट्रे अजून जवळ आली आहेत. कारण या दोन्ही राष्ट्रांना असे वाटते की, चीन हा आपला सामाईक शत्रू आहे. “शत्रूचा शत्रू, तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे ही दोन राष्ट्रे एकत्र आली आहेत. किंबहुना अमेरिका व भारत संबंधात सुधारणा होण्याचे प्रमुख कारणसुद्धा चीन हेच आहे.

वर्ष 1998 मध्ये भारताने जेव्हा अण्वस्त्र चाचण्या घेतल्या होत्या, त्यावेळी भारताला सर्वात जास्त जपानच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जपानने भारताविरोधात आघाडी उघडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यास सुरुवात केली होती. अण्वस्त्रांच्या बाबतीत जपान हा अत्यंत संवेदनशील देश आहे. कारण, आजपर्यंत फक्‍त एकाच देशावर अण्वस्त्रे पडली आहेत आणि तो देश म्हणजे जपान.

भारताच्या अण्वस्त्र चाचणीनंतर जपानने भारतावर निर्बंध लावले असले तरीही ते जास्त दिवस चालले नाहीत. कारण, भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर प्रगती करीत होती व चीन विरोधात आघाडी उघडण्यासाठी अमेरिका व जपान यांना भारताची गरज होती. शीतयुद्धाच्या काळात भारत व जपान यांच्यात असे काही खास संबंध नव्हते. कारण, जपान हा सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या गटात सामील असणारा देश आहे.

भारत हा अलिप्तवादी चळवळीत असला तरीही भारतात ओढा हा प्रामुख्याने रशियाकडे (युएसएसआर) अधिक होता. परंतु, 2006 पासून भारत व जपान यांच्यात वार्षिक बैठका (एक वर्ष भारत व एक वर्ष जपान) सुरू झाल्या आहेत. तेव्हापासून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. जसे मागील वर्षी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हाच भारतातील पहिली अति वेगवान अशा बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली. बुलेट ट्रेन हा प्रकल्प भारतात जपानच्या मदतीने सुरू होत आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये विकासासाठी जपान हा प्रयत्नशील आहे.

जपान हा भारतातील सर्वात मोठा देणगीदार असून भारतातील तिसरी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ही जपानकडून येते. उभय देशांत विज्ञान व अंतराळ संशोधनासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासंबंधी करार झाले आहेत. भारत व जपान यांच्यात एकत्रित लष्करी सरावही वेळोवेळी होत असतात. आंतरराष्ट्रीय व सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर जपान भारताला साथ देतो, तर उत्तर कोरियाकडे असलेल्या अण्वस्त्रांवरून अमेरिका व उत्तर कोरिया त्यांच्यात जेव्हा वाद निर्माण होतात, तेव्हा, त्याचा धोका जपानलाही असत. अशा वेळी भारत जपानची बाजू घेतो. अशा प्रकारे दोन्ही देश एकमेकांना पूरक अशी भूमिका घेतात.

मोदींच्या जपान दौऱ्यात भारत-जपान सहकार्याच्या दृष्टीने नव्या क्षेत्रांसंबंधी विचार झाला. हिंदी व प्रशांत महासागरातील चीनच्या वाढत्या हालचालींवर विस्तृत चर्चा करून तो प्रदेश शांत व समृद्ध कसा ठेवता येईल, यावर विचारविनिमय झाला. तसेच भारत व जपान यांच्यातसुद्धा 2+2 संवाद होणार, अशी घोषणा केली गेली. तसेच मोदींनी जपानी उद्योजकांना “मेक इन इंडिया’ अंतर्गत गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

गेल्या 15 वर्षात भारत व जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारले असले तरीही काही मुद्द्यावरून उभय देशात मतभेद आहेत. ह्या दोन दिवसीय बैठकीत ते चर्चेला येतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. गेल्या वर्षी चीनला विरोध करण्यासाठी भारत, जपान, अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांनी “क्वॉड ग्रुप’ तयार केला होता. परंतु, त्याचे भविष्य अजून अधांतरीच आहे.

चीनच्या “बेल्ट अँड रोड’ इनिशेटिवला पर्याय म्हणून भारत व जपान यांनी आशिया-आफ्रिका विकास मार्ग (ग्रोथ कॉरिडोर) नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यासाठी भारत 10 अब्ज तर जपान 30 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. परंतु, क्वॉड प्रमाणे हा प्रकल्पसुद्धा फक्‍त कागदावरच आहे. भारत व जपान यांच्यात वर्षाला फक्‍त 15 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो, तर जपान-चीन यांच्यात 300 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो.

भारत व जपान यांच्यात व्यापारवाढीसाठी प्रचंड वाव असूनही वाढीचे प्रयत्न झाले नाहीत. गेल्या 5 वर्षांपासून भारत व जपान यांच्यातील विमान खरेदी अडकून पडली आहे. भारत जपानकडून “शीनमायवा युएस-2 अँफिबियन’ विमान खरेदी करण्यास उत्सुक आहे. परंतु, विमानाच्या किमतीवरून दोन्ही देशात मतभेद आहेत. भारत-जपान हे एकमेकांचे विश्‍वासू मित्र आहेत. त्यांच्यातील क्षमता व त्रुटी या एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचा हात धरून राहिले तर दोघांचाही विकास होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)