#विदेशरंग: अमेरिका बनतोय भारत-रशिया संबंधातला अडसर 

कौस्तुभ कुलकर्णी 
सध्या भारत-रशिया द्विपक्षीय संबंध ताणले गेले आहेत. भारत अमेरिकेच्या जवळ जात असल्याची शंका रशियाला वाटते, तर अमेरिका भारताला रशियापासून तोडून आपल्या मित्र परिवारात जोडण्यास उत्सुक आहे. भारत मात्र आपल्या अलिप्तवादाचा पुरस्कार करण्यापासून परावृत्त होईल, असं चित्र नाही. टू प्लस टू बैठकीत भारतानं कुशलपणे अमेरिका व रशिया बरोबरचे संबंध कायम राखण्यात यश मिळवल्याचं दिसत आहे. 
भारत आणि अमेरिकेच्या द्विपक्षीय चर्चेत रशियन बनावटीच्या एस-400 क्षेपणास्त्रांचा विषयावर येऊन ग्रामोफोनची सुई अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह होती. प्रत्यक्षात त्या परिषदेत या विषयावर काय घडलं यासंबंधी आजही मौन बाळगलं जात आहे. अर्थात, हा फक्‍त या एका व्यवहाराचा विषय नाहीय. भारत आणि अमेरिकेच्या या परिषदेचे परिणाम दूरगामी असणार आहेत हे नक्की. अमेरिकेचा “काउंटरींग अमेरिकाज अडव्हर्सरीज थ्रु सॅंक्‍शन्स’ हा कायदा घात करणारा ठरण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट 2017 मध्ये हा कायदा अमलात आणला आणि या माध्यमातून भारताला रशियापासून दूर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असणार हे, असं दिसतंय. या कायद्याच्या माध्यमातून अमेरिका पुनश्‍च आपलं गतवर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे, हेही काही प्रमाणात स्पष्ट होतं.
भारताचे रशियाबरोबरचे संबंध बहुक्षेत्रीय आहेत आणि त्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचं संबंध असणं हितावह आहे. कोणा एका राष्ट्राचं धुरणीत्व जगावर नसावं या मताचा दोन्ही देश पुरस्कार करतात. भूतकाळात दोन्ही देशांचे आर्थिक संबंधही उत्तम होते. सोविएत महासंघाचं विभाजन झाल्यानंतरही या संबंधांमध्ये फार बदल झाला नाही. रशिया भारताचा सर्वात जवळचा व्यापारी मित्र राहिला आहे. दोन्ही देशांचे संबंध नागरी पातळीवरही दृढ असल्याचं पाहायला मिळतं. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहता, ट्रम्प सरकारची नक्की योजना काय आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ढोबळमानानं भारत-रशियातील संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाहीत, अशी समजूत अमेरिकी नोकरशाहीची झाल्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर भारताला रशियापासून तोडण्याची ही योग्य वेळ आहे, असा अंदाज अमेरिकेने बांधला असावा. म्हणूनच एस-400 चा मुद्दा उपस्थित करून हिंद-प्रशांत परिसरात चीनच्या वाढत्या प्रस्थाचं उदाहरण देत, रशियापासून तोडण्याची योजना अमेरिकेनं आखली असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशी व्यूहरचना करताना एस-400 च्या तोडीचं क्षेपणास्त्र भारताकरिता अमेरिकेकडे नाहीय ही बाब ते विसरत आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतर अमेरिकेनं अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची निर्मितच केली नाही.
असं असतानाही, अमेरिका आपली शस्त्रविक्री वाढावी, याकरता अशा योजना आखत आहे. रशियाकडून हे क्षेपणास्त्र घेतल्यास दीर्घ काळाकरिता भारताला रशियापासून तोडता येणार नाही. अमेरिका भारताच्या मदतीनं हिंद-प्रशात सागरात एक वर्चस्व निर्माण करू पाहात आहे, त्याचबरोबर भारताबरोबर दीर्घकालीन शस्त्र निर्मितीची योजना आखत आहे. अशी व्यामिश्र परिस्थिती असतानाही भारताने मात्र एस-400 चा सौदा पूर्ण करण्याचं ठामपणे अमेरिकेला सांगितलं असल्यानं अमेरिकेपुढे पर्याय उरलेला नाही. भारताने अमेरिकेला बाजारपेठेत काही आडकाठी केली नाही; त्याचप्रमाणे, रशियाशी संबंध न तोडण्याचा आपला निश्‍चय कायम ठेवतच, “अमेरिकेनं आपल्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये’, असा संदेशही भारतानं दिलाय.
“टू प्लस टू’ या परिषदेचं फलित बघितल्यास संरक्षण क्षेत्रात अमेरिकेनं भारतासमवेत सहकार्याचा करार केल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेनं या परिषदेदरम्यान भारताशी संपर्क अनुरूपता आणि संरक्षण करार (कॉम-कासा) करून ही परिषद सफल झाल्याचंच दर्शवलं आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षणाच्या क्षमतेत चांगलीच वाढ होणार आहे. तसेच हिंदी महासागर आणि हिंद-प्रशांत परिसरात चीनची दादागिरी मोडून काढण्यात भारताला यश येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. पाकिस्तानविषयक धोरणदेखील काही प्रमाणात बदलण्याविषयी अमेरिकेनं सूतोवाच केल्याचं बोललं जात आहे. असं झाल्यास भारताला पाकिस्तान आणि चीनकडून होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता आहे.
रशियाशी असलेल्या संबंधांबाबत भारताला अमेरिकेनं काहीच आडकाठी केल्याचं दिसत नाही. पण रशियन प्रसारमाध्यमांनी भारतावर टीका करताना भारत परस्परविरोधी देशांशी मैत्री करत आहे, असं म्हटलं आहे. अशी मैत्री केवळ आदर्श परिस्थितीच होऊ शकते. रशियन माध्यमांची ही मतं दूरदर्शी नाहीत, असंच म्हणावं लागेल. विविध देशांबरोबर भारत मैत्री करताना ही मैत्री कितपत उत्पादनक्षम असेल याची पडताळणी करतो. त्याचबरोबर भारतानं आतापर्यंत राखलेलं आपलं अलिप्त धोरण भारताला स्वैर संचारात मदतच करतं, हे मान्य करावं लागेल. अशा मैत्रीमध्ये समोरची राष्ट्रं बऱ्याचदा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात; पण असा दबावही भारतानं आतापर्यंत अत्यंत उत्तमरीत्या हाताळला आहे.
जागतिक व्यवस्थेमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण करण्याकरिता भारताला अशा नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागणार आहे. प्रत्येक मित्राबरोबर वाटाघाटी करताना भारतीय मुत्सद्यांना समतोल राखत आगेकूच करण्याची कला आत्मसात करावी लागणार आहे. तूर्तास तरी भारतानं अमेरिका आणि रशियाबरोबरच्या संबंधात कुठेही योग्य समतोल राखून आपलं आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत कौशल्य सिद्ध केलं आहे, असंच म्हणावं लागेल. आता बदलत्या स्थितीत काय होतं ते पाहायचं.
What is your reaction?
6 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)