#विदेशरंग : अफगाणवर वर्चस्वाची लढाई जिंकणार कोण? 

स्वप्निल श्रोत्री 

अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्याच्या लढाईत दहशतवादी जिंकतात की सरकार जिंकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तेथील सर्व शीख व हिंदू बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्यामध्ये सध्या अफगाणिस्तानमध्ये राहणे अशक्‍य असल्याची भावना दृढ होत आहे. धर्मांतर करा किंवा भारतात परत जात असे दोनच पर्याय उरले असल्याने हे लोक केव्हाही भारताच्या आश्रयाला येऊ शकतात. 

मागील महिन्यात अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्‌यात 19 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्‌यात विधानसभा निवडणूकीतील एकमेव शीख उमेदवार असलेल्या अवतार सिंग यांचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये असेच बॉंम्बस्फोट झाले होते. पहिल्या बॉंम्बस्फोटाच्या वार्तांकनासाठी पत्रकार गेले असता लगेच दुसरा स्फोट झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यात आठ पत्रकारांसह अनेक नागरिक व पोलिस मृत्युमुखी पडले. “आयएसआयएस’ने या हल्ल्‌याची जबाबदारी स्वीकारली असली, तरीही असा हल्ला होणार आहे याची पूर्वसूचना सरकार व सुरक्षा यंत्रणांना होती. सुरक्षा यंत्रणांचे अपयश दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडले असून त्यांच्या आत्मविश्‍वासात नक्कीच वाढ झालेली आहे. अफगाणिस्तानच्या जनतेला दहशतवाद, अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट हे काही नविन नाहीत. त्यांच्या दोन पिढ्या हेच पाहत मोठ्या झाल्या आहेत, त्यांना ह्याची सवयही झालेली आहे. किंबहुना हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
अफगाणिस्तानमध्ये आत्तापर्यंत तीन मोठी युद्धे झालेली आहेत. त्यातील पहिले सोव्हिएट-अफगाण युद्ध, जे 1979 ते 1989 पर्यंत चालले. दुसरे अंतर्गत गृहयुद्ध 1989 ते 1996. तिसरे अमेरिका अजून लढते आहेत ते अमेरिका-अफगाण युद्ध.

सन 1979 मध्ये सुरू झालेले सोव्हिएट-अफगाण युद्ध हे अफगाणिस्तानातील सरकार स्थानिक जमीनदार यांच्यामधील होते. सन 1973 ला सत्तेवर आलेले दाऊद खान यांच्या विरोधात बंड करून “पीपल डेमोक्रेटिक पार्टी अफगाणिस्तान’ (पीडीपीए) सत्तेवर आली. पीडीपीए सरकार हे साम्यवादी (कम्युनिस्ट) विचारसरणीचे असल्यामुळे त्यांनी सत्तेवर आल्यावर जमीन अधिग्रहण करण्यास सुरुवात केली. स्थानिक जमीनदारांच्या जमिनी घेऊन त्या शेतकरी व शेतमजूर यांना वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या जमीनदारांच्या एका मोठ्या गटाने पीडीपीए सरकारविरोधात सशस्त्र बंडाची सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यामुळे नाईलाजाने पीडीपीए सरकारने साम्यवादी सोव्हिएत रशियाची मदत मागितली. मोठ्या लष्करी सामर्थ्यानिशी 1979 ला सोव्हिएट सैन्य अफगाणिस्तान मध्ये दाखल झाले. तेथूनच सोव्हिएट-अफगाण युद्धाची सुरुवात झाली. या युद्धात रशियाचे अनेक सैनिक कामी आले. मोठे आर्थिक नुकसान झाले. युद्ध जिंकणे शक्‍य नसल्यामुळे रशियाने दहा वर्षानंतर 1989 पासून आपले सैन्य माघारी बोलविण्यास सुरुवात केली.

सोव्हिएट रशिया गेला, तोंपर्यंत जमीनदारांचे अनेक गट देशात कार्यरत झाले होते. त्यांनी रशियाची अफगाणिस्तानमध्ये दमछाक करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता रशियाने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यामुळे अफगाणिस्तानवरच्या वर्चस्वासाठी हेच गट आपापसात भांडायला लागले. ह्यातूनच अफगाणिस्तानचे दुसरे युद्ध सुरु झाले, जे अंतर्गत गृहयुद्ध म्हणून ओळखले जाते. सन 1989 ते 1996 पर्यंत चाललेल्या या युद्धात बाजी मारली ती महमंद उर्फ मुल्ला उमर याने. त्याच्या गटाचे नाव होते “तालिबान’.

सन 1980 मध्ये सौदी अरबमधून एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती अफगाणिस्तानात आली होती. राजकारण करण्याची किंवा अफगाणिस्तान वर राज्य करण्याची कोणतीही इच्छा नसली तरी त्या व्यक्तीचे “जिहाद’ हेच एक उद्दिष्ट होते. तालिबानच्या मदतीने त्या व्यक्तीने एक संघटना उभारली. त्याच्या संघटनेचे नाव होते “अल्‌ कायदा’. त्याच्या प्रमुखाचे नाव होते ओसामा बिन लादेन. अंतर्गत गृहयुद्धात तालिबानला विजयी करणाऱ्या ओसामा बिन लादेन आणि अयमन्‌-अल्‌-जवाहिरी ह्यांनी अनेक मोठे मोठे कारनामे केले आहेत. त्यासाठी त्यांना पाकिस्तानची आर्थिक व लष्करी मदत ही मोठ्या प्रमाणावर मिळाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये सन 1996 ला तालिबानचे सरकार सत्तेवर आले आणि ते 2001 पर्यंत टिकले. त्यामुळे 1996 ते 2001 हा काळ अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. मुल्ला उमरच्या तालिबान सरकारने सत्तेवर येताच “शरीया कायदा’ लागू केला. महिलांना शाळा बंद झाल्या, घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले, चोरी करताना कोणी सापडले, तर त्याचे हात तोडण्यात येऊ लागले. सन 2002 मध्ये आलेल्या एका आंतराष्ट्रीय अहवालानुसार त्या काळात महिलांसाठी सर्वात असुरक्षित जगातील ठिकाण म्हणजे अफगाणिस्तान होते.

तालिबान सरकारच्या मदतीने अफगाणिस्तानात जन्म घेतलेली अल्‌ कायदा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हातपाय पसरू लागली आहे. सन 1993 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेली बॉम्बफेक, सन 1998 ला आफ्रिकेतील अमेरिकेच्या दूतवासावर केलेला हल्ला, सन 2001 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकविलेली विमाने, सन 2004 मधील मद्रिद रेल्वेवरील हल्ला इत्यादी कारणांमुळे अफगाणिस्तानच्या राजकारणात अमेरिका सैन्यानिशी उतरली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी, “एक तर तुम्ही आमच्याबरोबर किंवा आमच्या विरोधात’, अशा जगाला उद्देशून केलेल्या भाषणात दहशतवादविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये उतरले आणि सन 2001 पासून तिसरे युद्ध सुरू झाले. सन 2014 पर्यंत या युद्धात अमेरिकेचे किमान चार हजार सैनिक कमी आले. परंतु आजही अमेरिकेला तालिबान, अल्‌ कायदा आणि आयएसआयएस यांचा नायनाट करिता आलेला नाही. आता येथील दहशतवादी गटांविरोधात अफगाणिस्तान सरकारचे लष्कर लढत आहे. अमेरिकेचे आजही 10,000 सैनिक तेथे आहेत. मात्र स्थानिक सैन्याला प्रशिक्षण आणि मदत करण्याशिवाय कोणतेही महत्वाचे काम करित नाहीत.

सन 1979 ला सुरू झालेली परिस्थिती आजही तशीच आहे. आता 2019 ला होणाऱ्या निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी सर्व दहशतवादी गट आपसात भांडत आहेत. किंबहुना सर्वात जास्त हल्ले कोण करतो यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागलेली आहे. आज अफगाणिस्तान सरकारचे नेतृत्व राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी व कार्यकारी प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला करीत आहेत. परंतु या दोन नेत्यांमध्ये सारे काही आलबेल आहे असे समजण्याचे काही कारण नाही. स्थानिक लष्करामध्ये प्रचंड भ्रष्टाचार व अविश्‍वास आहे. कोणतीही परकीय शक्ती अफगाणिस्तानवर विजय मिळवू शकत नाही, हे इतिहासातून अफगाणिस्तान सरकारने व लष्कराने समजले पाहिजे.

हिंदूकुश पर्वतरांग, डोंगरदऱ्या व वाळवंटी प्रदेश यामुळे दहशतवाद्यांना लपून सैन्यावर हल्ला करणे सोपे आहे. हे थांबविण्यासाठी स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी व कार्यकारी प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी एकमेकातील मतभेद विसरून आत्मविश्‍वासाने निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. कारण या वर्चस्वाच्या लढाईत त्यांचा विजय होणे महत्त्वाचे आहे. बाकी इतर मदतीसाठी भारतासह अनेक देश कायमच तयार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)