वितुष्ट निर्माण करू नका!

भोसरी – घरा-घरांत, भावा-भावांत, पिता-पुत्रांत, मित्रा-मित्रांत फूट कशी पडेल? त्यांच्यामध्ये वितुष्ट कसे निर्माण होईल? यासाठी प्रयत्न करणाऱ्या व मनामध्ये शंका-कुशंका पैदा करणाऱ्या व्यक्‍तींची पिढी कलंकित होते. यामुळे आपली कर्मगती नीट ठेऊन आचरण करावे, असे प्रतिपादन उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी भोसरी येथे चातुर्मास प्रवचनात श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करताना केले.

काही व्यक्‍तींची अपत्ये वाईट का होतात? याचे उत्तर धर्मशास्त्रात सांगितलेय. गीतेमध्येही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच उत्तर दिले आहे. घरा-घरांमध्ये शांती नांदावी, सुखाचा सहवास असावा, नात्यांमध्ये तेढ नसावी, यासाठी आपण चांगले वागले पाहिजे. जो सुख देतो, त्याच्याच घरी सुख-शांती नांदते. दुसऱ्याची प्रगती पाहून द्वेष निर्माण न होऊ देणे, क्‍लेश निर्माण होणार नाही, अशा प्रकारची सद्‌वर्तणूक आपली पिढी निर्माण करते. माता-पित्यांच्या कर्माचे फळ त्यांच्या पूत्र-पुत्रीच्या रुपाने आपणास दिसून येते.

वृद्धाश्रमात अनेकांच्या आई-वडिलांना पाहून आपण त्यांच्या मुलाला दोष देतो. परंतु हा निर्णय घेणारा तो एकटा नसतो, तर एक मुलगीही त्यामागे असते. जी कोणाच्या तरी घरुन आलेली असते. त्यामुळे मुलांपेक्षा मुलींना जास्त संस्कारित करा म्हणजे वृद्धाश्रमांची गरज पडणार नाही.

गुरू आनंद गाथा
आचार्य सम्राट आनंदऋषिजी महाराज यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त जैन स्थानक भुवन येथे ओजस्वी वक्‍त्या साध्वी वसुधाजी महाराज “गुरु आनंद गाथा’ प्रवचन मालिकेत जन्म, शिक्षा, वैराग्य, दीक्षा, शिकवण आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. जयंती सोहळ्यामध्ये उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली निबंध स्पर्धा, चित्रकला, नाटिका, भक्‍ती-संगीत आयोजित केले आहे. साध्वी वसुधाजी, साध्वी वंदिताजी, साध्वी विजेताजी, साध्वी वारिधीजी यांचे सान्निध्य लाभले आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)