विडणी ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचे बेकायदा वाटप

वाटप रद्द करण्याची मागणी : राज्यपालांनाही निवेदन

विडणी – विडणी, ता. फलटण येथील ग्रामपंचायतीने स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार मुलभूत सुविधांतर्गत बांधलेल्या गाळ्यांचे सरपंच व ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वाटप केले आहे. हे गाळ्यांचे वाटप रद्द करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी दत्तात्रय अब्दागिरे, मंगेश शेंडे व मनोहर शिंदे यांनी थेट राज्यपालांकडेच केली आहे.

-Ads-

विडणी, ता. फलटण येथील ग्रामपंचायतीने व्यावसायिकांसाठी गाळ्यांचे बांधकाम केले होते. एकूण 32 गाळे बांधण्यात आले होते. यापैकी 9 गाळे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून बांधण्यात आले होते. हे गाळे शासन आदेशानुसार अनुसूचित जाती-जमाती, दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत वाटप करावेत, असा शासन परिपत्रकानुसार आदेश आहे. तथापि, विडणीतील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखवली असून गावातीलच धनदांडग्यांकडून लाखो रुपयांचे डिपॉझिट घेवून गाळ्यांचे वाटप केले आहे.

याबाबत तक्रारदार दत्तात्रय भिवा अब्दागिरे, मनोहर शिंदे व मंगेश शेंडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेत याबाबतची तक्रार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार फलटण पंचायत समिती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती फलटण येथे दोनवेळा बैठकही झाली होती.

परंतु, अद्याप याबाबत जिल्हा परिषद पातळीवर कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे या सर्व प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याची शक्‍यता आहे, असे अब्दागिरे यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले. राज्याचे राज्यपाल, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यासंदर्भात उपोषणास बसणार असल्याचा इशारा अब्दागिरे, शेंडे, शिंदे यांनी दिला आहे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)