विटांचे घर : सुंदर आणि टिकाऊ (भाग-१)

विटांची घरे अधिक आकर्षक दिसतात; कारण विटांमध्ये अनेक रंगसंगतींचा मिलाप असतो आणि हे रंग कधीच फिके पडत नाहीत. पक्‍क्‍या भाजलेल्या विटा मातीचे कण एकत्र घट्ट धरून ठेवणाऱ्या असल्यामुळे विटांचे काम मजबूतही असते. खुल्या विटांच्या भिंती बांधण्याकडे आता पुन्हा एकदा लोकांचा कल दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. घराचे डिझाइन तयार करून घेण्यापूर्वी विटांचे असंख्य फायदे एकदा समजून घ्यायलाच हवेत.

लहान मुलांनी घराचे चित्र काढले तर ते बहुतांश वेळा उतरत्या छपराचे आणि विटांचे असते. विटांची घरे खरोखर अतिशय सुंदर दिसतात; परंतु सिमेंटच्या गिलाव्याचे इतके आकर्षण आपल्याला आहे की, विटांच्या घरांचे हे सौंदर्य शहरांत बघायला मिळत नाही. वास्तविक, विटा अत्यंत टिकाऊ असतात. त्या पिचत, सडत नाहीत. एवढेच नव्हे तर त्यावर रंग न लावताही भिंती सुंदर दिसतात. आजकाल केवळ सिमेंटचा गिलावाच नव्हे तर बांधकामातही सिमेंट कॉंक्रिटच्या ब्लॉक्‍सचा वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे स्टील आणि अन्य बांधकाम साहित्याच्या वापरात वाढ झाल्यामुळे मातीच्या विटांचे प्रमाण कमी होत आहे. अधिक उंचीच्या आणि अधिक भार सहन करण्याची क्षमता अपेक्षित असलेल्या इमारतींमध्ये सिमेंट आणि स्टीलचा वापर जास्त प्रमाणात करणे आवश्‍यक असतेच; परंतु सामान्य, कमी उंचीच्या आणि सर्वसाधारण उपयोगासाठीच्या इमारतींसाठीही असेच बांधकाम साहित्य अधिक वापरले जात असून, विटांचा वापर कमी झाला आहे.

विटांचे घर : सुंदर आणि टिकाऊ (भाग-२)

विटा हे असे बांधकाम साहित्य आहे, ज्याचे सौंदर्य कालातीत आहे. जसजसा काळ जाईल, तसतसे त्यांचे सौंदर्य अधिक खुलते. शिवाय, विटांच्या भिंती ध्वनिरोधक म्हणूनही काम करू शकतात. त्यामुळे अन्य सामग्रीपासून बनविलेल्या घरांपेक्षा विटांची घरे ध्वनिप्रदूषणापासून अधिक संरक्षण देतात. विटांच्या या गुणामुळे अशी घरे दाट लोकवस्तीच्या भागात अधिक उपयुक्त ठरतात. याखेरीज विटांचा एक असा गुणधर्म आहे, जो फारच कमी लोकांना माहीत आहे. विटांमध्ये “थर्मल मास’ म्हणजेच उष्णता नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. कोणत्याही घन वस्तूमध्ये “थर्मल मास’ हा गुणधर्म असण्याचा अर्थ असा की, ती वस्तू तापमान शोषून घेते आणि हळूहळू ते बाहेर सोडते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, विटांची घरे उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान असण्याच्या काळात थंड राहतात. हिवाळ्याच्या दिवसांत विटांच्या भिंती उष्णता शोषून घेतात आणि नंतर ती हळूहळू सोडत राहतात, जेणेकरून घरात उबदारपणा जाणवतो. तसेच विटांपासून बनविलेले घर दिवसा थंड आणि रात्री ऊबदार राहते. त्याचबरोबर विटा अग्निरोधक असतात. या गुणामुळे इतर कोणत्याही सामग्रीच्या साह्याने बांधलेल्या भिंतींपेक्षा विटांच्या भिंती अधिक उपयुक्त ठरतात.

– कमलेश गिरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)