सातारा: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही नंदी बैलांची “गुबू-गुबू’ जीवंत

कोकराळे : खटाव तालुक्‍यातील कोकराळे या गावात दारोदारी फिरत असताना नंदी बैल. (छाया : अजित रणपिसे, कोकराळे)

महेश जाधव

मायणी – आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच जुन्या गोष्टी हद्दपार होतांना दिसत आहेत, परंतु अशा ही परिस्थितीत ग्रामीण भागात बऱ्याच परंपरागत प्रथा व रुढी आजही जीवंत असल्याचे दिसून येत आहे. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असतानाही लोप पावत चाललेली नंदी बैलाची गुबु गुबु आजही ग्रामीण भागात जीवंत असल्याची बघायला मिळत आहे.

पूर्वीच्या काळात नंदी बैल गावात आला की, संपूर्ण गावात गलोगल्ली घरोघरी जायचा व त्याचा मालक गुबू गुबूच्या तालावर ढोल वाजवून “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?’ असा गंमतीशीर प्रश्न नंदीला विचारत होता. त्यावर नंदी होकारात्मक मान हलवून “होय’ असे उत्तर द्यायचा व त्याच्यावर खूश होऊन घरातील सुवासिनी महिला नंदीला नैवेद्य खाऊ घालून त्याच्या मालकाला धान्य स्वरूपात भेट वस्तू द्यायच्या. भल्या मोठ्या आकाराचा, पांढरा शुभ्र रंग, जाडदार मोठ मोठे शिंग, अंगावर रंगीबेरंगी शाल, कपाळावर बाशिंग, पायात व मानेवर घुंगरांची माळ अशी नंदी बैलाची ओळख होती. आज अशा स्वरूपाचा नंदी बैल दिसणे दुर्मिळ झाले असून योगायोगाने असाच नंदी खटाव तालुक्‍यातील खेड्यापाड्यात फिरत असून नंदी बैल व मालक सर्वांचेच मनसोक्त मनोरंजन करीत आहे. त्याला पाहण्यासाठी बालगोपाल मोठी गर्दी करीत असून सध्या शाळांना उन्हाळी सुट्या असल्याने तसेच घरपोच करमणुकीचे साधन उलपब्ध झाल्याने लहान थोरांना मोठा आनंद होत आहे. विज्ञानाच्या काळात ही शेतीच्या मशागती शिवाय इतर ठिकाणी ही बैलाचा चांगला उपयोग होत आहे. शहरातील लोकांना ज्याचा साधा लवलेशही नाही असा हा नंदी काही वर्षांनी ग्रामीण भागातून ही हद्दपार होणार की काय? अशा भीतीचा सूर सुज्ञ नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे. नंदीच्या मालकांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी गावोगावी फिरत कोसो अंतर पायी कापत बैलाचा सहाय्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी शासनाने आमच्याकडे ही थोडेशे लक्ष द्यावे, अशी मागणी नंदीच्या मालकाकडून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)