विज्ञानविश्‍व: स्मार्ट तावदानं

डॉ. मेघश्री दळवी

जगाचं सरासरी तापमान वाढतं आहे. त्यामुळे पूर, दुष्काळ, अति बर्फवृष्टी असे टोकाचे अनुभव आपल्या सर्वांना येत आहेत. त्याची आणखीही एक बाजू आहे. एअर कंडिशनिंगचा वापर पूर्वी कमी प्रमाणात व्हायचा. पण आता अनेक ठिकाणी एअर कंडिशनिंग अत्यावश्‍यक बनू लागलं आहे. परिणामी त्याच्यावर खर्च होणाऱ्या उर्जेचा वापर वाढतो आहे. दर वर्षी सहा टक्के अधिक ऊर्जा एअर कंडिशनिंगवर खर्च होते असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. अर्थात ऊर्जेची मागणी वाढल्याने अप्रत्यक्षपणे पर्यावरणावर आणखी परिणाम होत आहे. एअर कंडिशनिंग यंत्रणा घर किंवा ऑफिस शीतल ठेवताना बाहेर उष्ण झोत टाकते. त्यामुळे खुल्या हवेत अधिक उष्मा जाणवतो असं काही तज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे तापमानवाढीत आणखी भर!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सगळ्यावर मात्र आता तंत्रज्ञानानेच उपाय शोधला आहे. अमेरिकेतल्या एमआयटीने (मॅसाच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलजी) आता एक खास उष्णतारोधक आवरण तयार केलं आहे. या पदार्थाचा पातळ थर किंवा फिल्म खिडक्‍यांच्या तावदानांवर बसवता येईल. सूर्याप्रकाशातली सुमारे सत्तर टक्के उष्णता हे आवरण रोखू शकेल असा एमआयटीमधील शास्त्रज्ञांचा दावा आहे. साधारण 30 ते 32 अंश सेल्शियसपर्यन्त हे आवरण पारदर्शक राहून प्रकाश आणि उष्णतेला आत येऊ देतं. मात्र त्यापुढे ते किंचित अपारदर्शक होत उष्णतेला बाहेरच रोखतं. ही किमया आहे अतिसूक्ष्म मायक्रो-कणांची. हे मायक्रो-कण तापमानानुसार आपली स्थिती बदलतात आणि अधिकच्या उष्णतेला प्रतिबंध करतात. अशी फिल्म तावदानांवर लावून एअर कंडिशनिंगसाठी लागणाऱ्या ऊर्जेचा खर्च 10 टक्‍क्‍यांनी कमी होईल. ऑफिसेसमध्ये 40 टक्‍की ऊर्जा एअर कंडिशनिंगसाठी वापरली जाते. त्यामुळे 10 टक्क्‌यांनीही खूप फरक पडेल.

काही रासायनिक पदार्थांचा लेप असलेल्या फिल्म्स आजही तावदानांवर लावल्या जातात. त्या तुलनेत ही नवी फिल्म वेगळं तंत्रज्ञान वापरते आणि जास्त कार्यक्षम आहे. शिवाय ती तापमानाला प्रतिसाद देण्याइतपत स्मार्ट असल्याने तिचा फायदा जास्त आहे. एमआयटीने केलेल्या चाचण्यांनुसार या स्मार्ट तावदानांमुळे आत अधिक थंडावा जाणवतो. सूर्यप्रकाशामुळे दर चौरस मीटरमागे पाच बल्बइतकी उष्णता घरात येते. हे प्रमाण या तावदानांमुळे चांगलंच घटतं. हॉंगकॉंग बेट असल्याने तिथे जागेची चणचण नेहमीच जाणवते. त्यामुळे उंच गगनचुंबी इमारतीं आणि दर चौकिमीमध्ये 7,000 इतकी अतिशय घनदाट वस्ती तिथे आहे. क्वून टोंग या भागात तर दर चौकिमीमध्ये 57,000 माणसं राहतात.

हॉंगकॉंगचं सरासरी तापमान साधारण 28-30 अंश सेल्शियस असलं तरी, तिथे जागा कमी असल्याने हवा खेळती राहील अशी व्यवस्था सहसा करत येत नाही. उंच इमारतींमध्ये काही खोल्यांना खिडक्‍याही नसतात. उन्हाळ्यात तापमान थोडं जरी वाढलं तरी उष्णतेचा कडाका प्रचंड जाणवतो. परिणामी तिथे एअर कंडिशनिंगचा सर्रास वापर होतो. पण त्याचे तोटे आणि खर्च लक्षात आल्याने अलीकडे काही नैसर्गिक प्रकारे तापमान कमी करण्याचे विचार सुरू आहेत. याचसाठी युनिवर्सिटी ऑफ हॉंगकॉंगने एमआयटीसोबत या संशोधनात भाग घेतला होता. लगेचच वापर करता यावा या हेतूने या स्मार्ट तावदानांचा खर्च आटोक्‍यात असावा याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)