विज्ञानविश्‍व: सौरसीमेच्या पल्याड

मेघश्री दळवी

आपल्या सूर्यमालेतल्या दूरवरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी व्हॉयेजर 2 हे यान नासाने 1977 मध्ये प्रक्षेपित केलं होतं. पृथ्वीवरून निघून मंगळाच्या पलीकडे गेल्यावर पुढचे चार मोठे ग्रह म्हणजे गुरु, शनी, युरेनस, आणि नेपच्यून यांना भेट द्यायला व्हॉयेजर 2सज्ज झालं. 1985 मध्ये पहिल्यांदाच ते युरेनसच्या जवळ गेलं. युरेनसचे पहिले फोटो म्हणजे शास्त्रज्ञांसाठी एक खजिना खुला झाला होता. मग 1989 मध्ये व्हॉयेजर 2नेपच्यूनजवळ पोचलं. अंतराळप्रवासासाठी हा एक खूप महत्त्वाचा टप्पा होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेपच्यूनच्या पुढे व्हॉयेजरने प्लूटोचंही निरीक्षण केलं. पण प्लूटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेतल्याने रूढार्थाने सूर्यमाला संपली होती. त्यानंतरचा व्हॉयेजरचा कायपर बेल्टमधला प्रवास हा अतिशय अनोखा होता. त्याने वाटेत अनेक लघुग्रहांचं अवलोकन केलं. अंतराळातले कित्येक आगळे नजारे पाहिले. पण त्याची खरी नजर होती ती हेलिओस्फीअरकडे – सौरसीमेकडे.

सूर्याचा प्रकाश जिथवर पोहोचतो आणि सौरवाऱ्याचा परिणाम जिथपर्यंत जाणवतो, ती त्रिमित सीमा म्हणजे हेलिओस्फीअर. ही सौरसीमा एका अर्थाने सूर्याचं प्रभावक्षेत्र दाखवते. त्याच्या पलिकडीलं अंतराळ अनेक ग्रहताऱ्यांनी भरलेला आहे. सौरसीमेपल्याडच्या अंतराळाला इंटरस्टेलर स्पेस म्हणतात. इंटरस्टेलर नावाच्या चित्रपटात इतर तारे आणि त्यांच्या ग्रहमाला दाखवल्या होत्या. तर अलिकडेच येऊन गेलेला ओमुआमुआ होता एक इंटरस्टेलर ऑब्जेक्‍ट, सौरसीमेपलीकडून आपल्या सूर्यमालेत आलेली पहिलीच वस्तू.

या इंटरस्टेलर अंतराळाचं शास्त्रज्ञांना विलक्षण आकर्षण असतं. साहजिकच आहे, आपल्या जवळच्या ग्रहांचा अभ्यास करून झाल्यावर आपण जातो दूरच्या ग्रहांकडे. आणि तेही झाल्यावर पुढचं लक्ष्य अर्थातच असतं ते हेलिओस्फीअर ओलांडून इंटरस्टेलर अंतराळात जाण्याचं.

आणि हेच आत्ता व्हॉयेजर 2 या यानाने करून दाखवलं आहे! चाळीस वर्षांहूनही अधिक प्रवास करून हे आपलं यान आता सौरसीमेच्या पल्याड पोचलं आहे. आपलं सूर्यापासून जे अंतर आहे, त्याच्या शतपटीने अंतरावर असलेली ही सीमा 9 नोव्हेंबरला व्हॉयेजरने पार केली. या आठवड्यात 10 डिसेंबर 2018 रोजी नासा या अंतराळ संशोधन संस्थेने हे जाहीर केलं आणि पुन्हा एकदा जगभर उत्साहाचे वारे वाहू लागले.

खगोलशास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही घटना अंतराळाच्या अभ्यासासाठी प्रचंड मोलाची आहे. व्हॉयेजर 1 नंतर व्हॉयेजर 2काय नवी माहिती मिळवतं आहे याची त्यांना उत्सुकता आहे. इंटरस्टेलर अंतराळाविषयी कुतूहल मिटवण्याची ही उत्तम संधी आहे. तर तंत्रज्ञांसाठी हे त्यांच्या कौशल्याचंयश आहे. 40 वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान वापरून तयार केलेलं हे यान अजूनही सुरू आहे. आपल्या मार्गावर योग्य प्रकारे प्रवास करत आहे. वैश्‍विक किरणांचा मारा सहन करू शकलं आहे. त्यातली उपकरणं व्यवस्थित चालत आहेत. त्यांच्यात आलेले बारीकसारीक दोष आपण दुरून दुरुस्त करू शकलो आहोत. विविध प्रकारची माहिती व्हॉयेजर-2 आपल्यापर्यंत पोचवत आहे. हे खरोखरीच अद्‌भुत आहे.

आता आपण याहीपुढे मजल मारणार आहोत. इतर दूरच्या ग्रहांपर्यंत जाणार आहोत. माणसाची वस्ती अंतराळात पसरवणार आहोत. या सगळ्या योजनांना अशा घटनांनी पुष्टी मिळते. आपण पुढचं पाऊल अधिक आत्मविश्‍वासाने उचलू शकतो. सर्वसामान्यांच्या दृष्टीने व्हॉयेजर सौरसीमेच्या पल्याड पोहोचण्याचा अर्थ म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेचा आणि सतत नवनवीन क्षितिजं धुंडाळण्याच्या आकांक्षेचा विजय आहे. व्हॉयेजर 2 च्या सीमोल्लंघनाचं हे खरं महत्त्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)