#विज्ञानविश्‍व: सुरक्षारक्षक रोबॉट्‌स 

मेघश्री दळवी 

रोबॉट्‌स आता हळूहळू सगळ्या क्षेत्रांमध्ये शिरकाव करायला लागले आहेत. त्याचे फायदे नक्‍कीच आहेत. विशेषत: न थकता, न कंटाळता, चोवीस तास सतत दक्ष राहून काम करण्यासाठी रोबॉट्‌स उत्तम असतात. शिवाय माणसाला धोका असेल अशा जागी रोबॉट्‌सचा वापर करणे जास्त योग्य ठरतं. यासाठीच रोबॉट्‌सचा आता सुरक्षारक्षक म्हणून वापर सुरू झालाय.

-Ads-

कॅलिफोर्नियामधली एक कंपनी रोबॉट्‌सचा असा वापर करण्यासाठी गेली चार-पाच वर्षें प्रयत्न करते आहे. त्याचंच फलित म्हणजे के-पाच हा रक्षक रोबॉट. पाच फूट उंचीचा, शंकूच्या आकाराचा हा रोबॉट साधारण तीनशे किलो वजनाचा आहे. अर्थात तो सुरक्षारक्षक म्हणून काम करताना कोणी त्याला उचलून फेकण्याचं धाडस करूच शकणार नाही! के-पाच आता अमेरिकेतील काही मॉल्स, शाळा, आणि कार्यालयांमध्ये दिसायला लागले आहेत. त्यात वेगवेगळे संवेदक (सेन्सर्स) बसवलेले आहेत. कॅमेरा, दिशादर्शक, हवामानासाठी, आणि अडथळे ओळखण्यासाठी संवेदक अशा सर्वांच्या साथीने तो आपलं काम पार पाडतो. जीपीएस आणि वायफाय वापरून तो जागोजागीची नोंद घेऊन कार्यालयात जमा करतो. कोणी आवारात प्रवेश करताना त्याच्याकडे ओळखपत्र आहे का याची तपासणी के-पाच करू शकतो.

कोबाल्ट हा असाच एक आणखी नवा सुरक्षारक्षक. आवाजाची दिशा समजणे, प्रकाशाचं प्रमाण मोजणे, हवेच्या तापमानातला बदल ओळखणे असे अत्याधुनिक संवेदक त्याच्यात आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी सुरक्षेचं कवच भेदून कोणी घुसखोर आले तर कोबाल्ट तत्काळ ते ओळखून मदतीला इतरांना बोलावू शकतो. कोबाल्टलादेखील शंकूचा आकार दिलेला आहे. सहज वावरण्यासाठी आणि तोल राखण्यासाठी हा आकार उत्तम ठरतो असा संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे हे शंकू रोबॉट्‌स लवकरच तुम्हांलाही मॉल, दुकानं, बॅंका, ऑफिसं, पार्किंगच्या जागा अशा ठिकाणी पाहायला मिळतील. सुरक्षारक्षक रोबॉट्‌स आणखीही काही ठिकाणी चांगले उपयोगी पडतील. कारखान्यांमध्ये सगळीकडे सुरक्षा पाळली जाते आहे का याची पाहणी करण्यासाठी असे लहानमोठे रोबॉट्‌स आता वापरायला सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या कारखान्यात जागोजागी फिरून ते पूर्ण व्यवस्थेचं चित्रण करतात. एक प्रकारचा फिरता सीसीटीव्ही म्हणा ना. अर्थात त्यात स्मार्ट यंत्रणा असल्याने केवळ चित्रीकरण करून ते थांबत नाहीत, तर लगोलग त्या चित्रीकरणाचं विश्‍लेषण करतात. सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी किंवा चुका आढळल्या तर ते अलार्म देतात. गरज पडल्यास तिथल्या कामगारांना सूचना देतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ती माहिती तत्काळ पोचवतात.

अजूनही या रोबॉट्‌समध्ये सुधारणेला वाव आहे. माणसांशी चांगला संवाद साधण्याबाबत त्यांच्यावर प्रयोग सुरू आहेत. मॉलमध्ये फक्त सुरक्षेकडे न बघता आलेल्या ग्राहकांना माहिती देणे, इतर मदत करणे ही कामंदेखील हे रक्षक करतील अशी त्यामागे कल्पना आहे. अशा रोबॉट्‌सची एक फौज ठेवली तर त्यांच्यावर देखरेख करायला आज खऱ्याखुऱ्या सुरक्षारक्षकांची गरज पडते. तिथेही रोबॉट्‌स वापरता येतील. हे रोबॉट्‌स फिरत असताना त्यांना ड्रोन्सची साथ दिली तर एक मुख्य रोबॉट आणि सोबत आवारात उडणारे ड्रोन्स असा वापर करता येईल. सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी विज्ञानकथा लेखक आयझॅक असिमोव्ह यांनी रोबॉट्‌सचे तीन नियम मांडले होते. ते नियम आता रोबोटिक्‍समध्ये मार्गदर्शक तत्त्व म्हणून वापरले जातात. या नव्या सुरक्षारक्षक रोबॉट्‌समध्येही या नियमांशी सुसंगत अशी वागणूक अपेक्षित आहे. उद्या असे रोबॉट्‌स जागोजागी दिसायला लागल्यावर आपल्याला त्यांची सवय होईल आणि आपण त्यांच्या सूचना पाळायला लागू.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)